आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहयो अपहारप्रकरणाची फाईल माझ्यासमोर ठेवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जामखेड पंचायत समितीच्या इमारतीचे निकृष्ट बांधकाम व रोहयो गैरव्यवहार प्रकरणी निलंबनाचा आदेश बजावण्यास टाळाटाळ केल्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत बुधवारी गोंधळ झाला. अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी रोहयो प्रकरणाची फाइल माझ्यासमोर ठेवा, मी निर्णय घेईन, असे अधिकार्‍यांना सांगितले.

सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती शाहूराव घुटे, हर्षदा काकडे, बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, सदस्य बाळासाहेब हराळ, राजेंद्र फाळके, वैभव पिचड, सचिन जगताप, सुवर्णा निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, सभेचे सचिव जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

रोहयो गैरव्यवहारप्रकरणी दोषी शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाई का केली नाही, असा सवाल सदस्य हराळ यांनी केला. त्यावर अधिकार्‍यांनी निलंबनाची कारवाई स्थगित करण्याच्या सूचना होत्या, असे सांगितले. हराळ म्हणाले, जर कारवाई स्थगित करण्याच्या सूचना दिल्या होत्या, तर काही दिवसांपूर्वी कार्यालयीन अधीक्षकाला कारणे दाखवा नोटीस का बजावली? त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सर्व सदस्यांनी लावून धरली. लंघे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर कारवाईचे आदेश दिले. या मुद्दय़ावरून सुमारे अर्धा तास गोंधळ निर्माण झाला होता.

जामखेड पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 1 कोटी 56 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. गुणवत्ता नियंत्रक पथकाने दिलेल्या पाहणी अहवालानुसार या इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले. संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपअभियंता व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यकारी अभियंत्यावरही कारवाई करावी, असा आग्रह सदस्यांनी धरला. बांधकाम सुरू असताना कार्यकारी अभियंत्याच्या ही बाब एकदाही कशी लक्षात आली नाही, याबाबत सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

केडगाव येथील जि. प. शाळेचे काम अपूर्ण

केडगाव येथील प्राथमिक शाळेची 9 लाख 15 हजार रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली. त्याची बिलेही काढण्यात आली. परंतु हे काम अपूर्णच राहिले असल्याचे मुख्याध्यापकांनी वेळोवेळी प्रशासनाला कळवले. परंतु अधिकार्‍यांकडून हे प्रकरण दडपले, असा आरोप सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केला.