आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्यांच्या पतींमुळे पदाधिकारी हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेत पन्नास टक्के महिला सदस्य आहेत. पण, बहुतेकींचे कामकाज त्यांचे पतीच पाहतात. पतीराजच पत्नीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन भरभरून टीकाही करतात. त्यामुळे पदाधिकारी व अधिकारी हैराण झाले आहेत. पण त्यांची अवस्था सांगता येईना अन् सहन होईना अशी झाली आहे.

विविध क्षेत्रांत भरारी घेणार्‍या महिला राजकारणातही मागे नाहीत. जिल्हा परिषदेत पन्नास टक्के महिला सदस्य निवडून आल्या आहेत. यातील काही सदस्य नवीन असल्या, तरी पोटतिडकीने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतात. मात्र, अनेक महिलांचे पती जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी वर्तमानपत्रांतून पत्रकबाजी करतात. या प्रकारामुळे गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी, तसेच अधिकारी हैराण झाले आहेत. महिला सदस्यांनी त्यांच्या समस्या थेट आमच्याकडे मांडाव्यात. त्यांचे पतीराज अनावश्यक पुढाकार घेऊन टीका करतात, अशी खंत काही अधिकारी व पदाधिकार्‍यांनी खासगीत व्यक्त केली.

राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जायचे असल्याने पदाधिकारी या प्रकाराबाबत मौन पाळून आहेत, तर अधिकारी कानाला हात लावतात. जिल्हा परिषदेच्या डायरीत सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यात काही महिला सदस्यांच्या नावासमोर त्यांच्या पतीराजांचेच दूरध्वनी क्रमांक आहेत. त्यामुळे थेट संबंधित सदस्यांशी संपर्क होत नाही. काही समित्यांच्या कारभाराविषयी देखील ठरावीक महिला सदस्यपती मागण्या मांडतात.

अँन्टी चेंबर कुणाचे?
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकार्‍यांना अँन्टी चेंबर आहेत. पण हे अँन्टी चेंबर आता सार्वजनिक झाले आहेत. कोणीही येतो अन् कुणाच्याही चेंबरमध्ये बसतो. समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या चेंबरमध्ये पदाधिकारी नसताना सदस्य बसलेले असतात.

अनुभवातून सुधारणा होईल
सर्व महिला सदस्यांचे पती कारभार चालवतात असे नाही. ज्या महिला प्रथमच निवडून आल्या, त्या सक्षमपणे काम पाहतील. अनुभवाने सुधारणा होईल. पतीराजांनी मोकळीक दिल्यास त्याचा फायदा मिळेल.’’ मोनिका राजळे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.

मोकळीक मिळावी
महिला सदस्य सभागृहात जनतेचे प्रश्न मांडतात. काही सदस्यांचे पतीही जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात. पतींनी त्यांना कारभार करण्यास मोकळीक दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल. ’’ विठ्ठल लंघे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.