आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

289 शाळांमधील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील 289 शाळाखोल्या पाडण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला मिळाला आहे. मात्र, शासनाच्या गुंतागुंतीच्या धोरणामुळे या खोल्या पाडण्यास विलंब होत आहे. पावसाळ्यात या खोल्या कोसळल्यास शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा शुक्रवारी उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य प्रतिभा पाचपुते, सुरेखा राजेभोसले, नंदा भुसे, अँड. आझाद ठुबे, प्रवीण घुले, मीनाक्षी थोरात, शिक्षणाधिकारी जी. एस. मंडलीक उपस्थित होते.

धोकादायक इमारतीतील (निर्लेखीत) शाळांबाबत घुले यांनी प्रश्न उपस्थित करीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. तातडीने शाळांचे निर्लेखन करावे, अशी मागणी करीत ठुबे यांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे सभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

प्राथमिक शाळांच्या बांधकामाचा कालावधी, त्याचा प्रकार, त्यावेळी आलेला खर्च व घसारा मूल्य गृहित धरून शाळा निर्लेखनाबाबत निर्णय घेतला जातो. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती, तसेच ग्रामसभेचा ठराव घेऊन गटशिक्षणाधिकार्‍यांकडे शाळा निर्लेखनाबाबत मागणी केली जाते. गटशिक्षणाधिकारी व बांधकाम विभागाचा उपअभियंता शाळेची पाहणी करून अहवाल सादर करतात. शासनाच्या निर्देशानुसार निकष पूर्तता केल्यास जिल्हा परिषदेकडे अहवाल पाठवला जातो. शिक्षण विभागाकडे सुमारे 289 वर्गखोल्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारी अभियंत्याकडे पाठवले जातात. अधीक्षक अभियंत्यांना अहवाल सादर केल्यानंतर निर्लेखन कार्यवाही केली जाते. ही पद्धत वेळखाऊ असल्याने निर्लेखनास विलंब होत आहे.

पावसाळा सुरू झाल्यामुळे जुन्या शाळाखोल्यांची पडझड होण्याची शक्यता आहे. वादळाने पत्रे उडालेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करावी, असे आदेश राजळे यांनी दिले.

प्रशासन कात्रीत

289 शाळाखोल्या निर्लेखनासाठी पात्र ठरल्यास या इमारती पाडाव्या लागतील. नव्याने बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे अशा कात्रीत प्रशासन सापडले आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होत नाही.

निर्लेखनासाठी प्रस्ताव

कर्जत 18, अकोले 45, नेवासे 68, श्रीगोंदे 21, राहुरी 3, पारनेर 39, राहाता 9, कोपरगाव 15, श्रीरामपूर 4, नगर 9, संगमनेर 4.