आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जि. प. स्थायीच्या सभेत उद्घाटनावरून खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कान्हूरपठार (ता. पारनेर) येथील आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे उपस्थित होत्या, पण ज्या केंद्राला मी मंजुरी मिळवली त्या कार्यक्रमाबाबत मला का विचारले नाही, असा जाब सदस्य सुजित झावरे यांनी स्थायीच्या सभेत राजळे यांना विचारला. परस्पर उद्घाटनामुळे प्रोटोकॉलचा भंग झाल्याचेही झावरे म्हणाले.

स्थायी समितीची सभा सोमवारी जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष राजळे,सभापती कैलास वाकचौरे, बाबासाहेब तांबे, हर्षदा काकडे, शाहूराव घुटे, सदस्य सुजित झावरे, बाळासाहेब हराळ, वैभव पिचड, सचिन जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यावेळी उपस्थित होते.

जि. प. इमारतीचे उद्घाटन, तसेच इतर कार्यक्रमांबाबत अध्यक्ष, तसेच सीईओंची परवानगी घेण्याचा प्रोटोकॉल आहे. मात्र, कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन प्रोटोकॉल न पाळता करण्यात आले या मुद्दय़ावरून झावरे यांनी राजळे यांना धारेवर धरले.

झावरे म्हणाले, जुलै 2007 मध्ये मी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला. असे असताना आमदाराच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. मला याबाबत विचारण्याचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. निमंत्रणपत्रिका कोणी छापल्या तेही माहीत नाही.

राजळे यांनी प्रतिसाद न दिल्याने वाद आणखी चिघळला. अध्यक्ष लंघे व सदस्य पिचड यांनी मध्यस्थी केली. या सर्व प्रकारात जिल्हा आरोग्यअधिकार्‍यांनी मात्र हात झटकले. त्यामुळे सभेत गोंधळ झाला.

कर्जत तालुक्यातील मावळेवस्ती शाळेच्या पोषण आहारात युरियाची भेसळ आढळली. हराळ यांनी त्याकडे लक्ष वेधले. शासकीय प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर संबंधित पुरवठादारावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त असलेल्या 38 पदांविषयी झावरे व पिचड यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर लंघे यांनी रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, तसेच सर्पदंश, श्वान प्रतिबंधक लस उपलब्ध करण्याच्या सूचना आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.