आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagarkar Pawan Naik Sing Song In Iran Behalf Of The Musice Festival

नगरकर पवन नाईकने इराणमधील संगीत महोत्सवात केले गायन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- इराणमध्ये नुकत्याच झालेल्या 28व्या फज्र आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात नगरचे गायक पवन श्रीकांत नाईक यांनी भारतीय रागदारी सादर करीत तेथील रसिकांची वाहवा मिळवली. या महोत्सवात देश-विदेशातील 80 कलावृंद सहभागी झाले होते.

इराणचा 25 दिवसांचा दौरा पूर्ण करून नाईक नगरला परतले. त्यांचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय दौरा. अवा-ए-जमीन (साऊंड ऑफ द अर्थ) या इंडो-पर्शियन फ्युजन कलावृंदात त्यांचा समावेश होता. नाईक यांनी इराणमधील तेहरान, गुरगान व शिराज या ऐतिहासिक शहरांत झालेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तीन मैफली सादर केल्या. मेहेर आफरिन या लहान मुलांसाठी काम करणार्‍या समाजसेवी संस्थेसाठी त्यांनी दोन विशेष मैफली केल्या. भारतीय संगीतातील तराणा, सरगमगीत व छोटे ख्याल, बागेश्री, किरवाणी, मालकंस, आहिर भैरव व भैरवी असे विविध राग त्यांनी सादर केले. काही सुफी कवने हिंदी, फारसी व अरबी भाषेत सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. अनेक रसिकांनी त्यांच्या मोबाइल डायलर टोनसाठी या संगीताची निवड करून विशेष दाद दिली.

नाईक यांच्याबरोबर गायक म्हणून वाहिद आइर्यन व हुर्बश खलिली, तसेच साथ संगतकार म्हणून विवेक सॅम्युअल (मोहन वीणा), उदय देशपांडे (तबला), मोज्दबा कलंतरी (डफ), मुजगान (उदू), शिमॉ व मिनू (कमांचे), नाजनिन (उद) व उमीद (डीजे) यांनी काम पाहिले.

पवन नाईक यांची इंडो पर्शियन फ्युजन रचना असलेली हालिया ही सीडी इराणमध्ये प्रकाशित झाली. या सीडीलाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे या सीडीत नगर येथील मेहेरप्रेमी कलावंत मधुकर डाडर यांच्या रचनेचा समावेश आहे. इराणचा दौरा यशस्वी झाल्यामुळे पवन नाईक यांनी पुढील महिन्यात युरोपच्या दौर्‍याचे निमंत्रण मिळाले आहे.
पवन नाईक यांच्या या यशाबद्दल त्यांचे गुरुजन सुरेश साळवी, कुमुदिनी बोपर्डीकर, डॉ. म. ना. बोपर्डीकर, प्रा. रेवणनाथ भनगडे, प्रा. सतीश आचार्य, प्रा. शुभांगी मांडे, शुभलक्ष्मी गुणे, रघुनाथराव केसकर, वीणा कुलकर्णी, शुभांगी बहुलीकर, डॉ. विकास कशाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.