आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिवळा बीचवरील स्पर्धा नगरच्या जलतरणपटूंनी गाजवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चिवळा बीचवर झालेली राज्यस्तरीय समुद्री जलतरण स्पर्धा नगरच्या जलतरणपटूंनी गाजवली. या जलतरणपटूंचे नेतृत्त्व कुलकर्णी स्विमिंग सेंटरचे संचालक प्रा. गणेश कुलकर्णी यांनी केले.

विविध वयोगटांतील स्त्री-पुरूष, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असे १ हजार २२८ जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ४७ अपंग जलतरणपटूंचाही त्यात सहभाग होता. एरवी शांत असलेल्या चिवडा बीचवर पहाटे पाच वाजल्यापासून स्पर्धक, त्यांचे पालक, आयोजक जमले होते. स्पर्धकांची वर्गवारी करून त्यांचा छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत नेण्यात आले.

नगरच्या मेघना कुलकर्णी हिने मुलींच्या १३ ते १५ वयोगटात तीन किलोमीटर समुद्री अंतर २९ मिनिटांत पार करून अकरावा क्रमांक पटकावला. एकता कुलकर्णी हिने मुलींच्या १० ते १२ वर्षे वयोगटात एक किलोमीटर समुद्री अंतर २९ मिनिटांत पार करून आठवा क्रमांक पटकावला. पुरूषांच्या २६ ते ३५ वयोगटात नकुल वने (तीन किलोमीटर) व मुलांच्या ११ ते १२ वर्षे वयोगटात आनंद कुकडे (दोन किलोमीटर) सहभागी झाले होते. या स्पर्धकांच्या बोटीत मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक प्रा. गणेश कुलकर्णी उपस्थित होते. पहिल्या दहा क्रमांकात पारितोषिक मिळवणाऱ्या इयत्ता चौथीतील एकता कुलकर्णी हिचा विशेष गौरव करण्यात आला. ती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जलतरण तलावात नियमित सराव करते. गोव्यात २२ फेब्रुवारीला कोलवा बीचवर होणाऱ्या गोवा स्विमथॉन स्पर्धेत मेघना कुलकर्णी (५ किलोमीटर) व एकता कुलकर्णी (१ किलोमीटर) सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत सहभागी व्हायचंय?
गोव्यात होणाऱ्या समुद्री जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा. गणेश कुलकर्णी यांच्याशी मोबाइल ९८९०८१८९१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी वयोगट १० ते १४, १३ ते १७ मुले-मुली, १७ ते ३५ स्त्री-पुरूष व ३५ पासून पुढे, अपंग जलतरणपटू असे गट आहेत.