आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरातील आर्थिक व्यवहार थंडावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोदी सरकारने पाचशे हजारांच्या चलनी नोटा अचानक रद्द केल्याने देशभरात एकच धांदल उडाली. नगर शहरातील चित्रही वेगळे नव्हते. दिवसभर सर्व दुकानांमध्ये शुकशुकाट होता. सर्व आर्थिक व्यवहार थंडावले होते. तुरळक ग्राहक पाचशे-हजारांच्या नोटा घेऊन आले, परंतु त्यांनाही रिकाम्या हातानेच परतावे लागले. पाचशे-हजारांच्या नोटा पेट्राेलपंपावर स्वीकारण्यात येत असल्याने शहरातील प्रत्येक पंपावर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. तथापि, पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याची सक्ती करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
पाचशे हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद झाल्याचे वृत्त मंगळवारी रात्री समजताच अनेकांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर जेव्हा ही बातमी व्हायरल झाली, तेव्हा खात्री करण्यासाठी अनेकजण टीव्हीसमोर बसले. टीव्हीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकून या नोटा बंद झाल्याची खात्री पटली. सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी काहींना मात्र मोठा धक्का बसला. पेट्रोलपंपावर पाचशे हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या. शंभर, दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून उर्वरित पैसे खर्चासाठी होतील, असा अनेकांचा समज होता. परंतु पंपचालकांनी आडमुठेपणाची भूमिका घेत किमान पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याची सक्ती केली. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पाचशे रुपयांचे पेट्रोल भरावे लागले.

शहरातील कापडबाजार, दाळमंडई, मार्केट यार्ड, एमजी रोड, सावेडी अशा विविध भागात दिवसभर शुकशुकाट होता. सकाळपासून सर्व दुकाने सुरू होती, परंतु दिवसभर ग्राहक फिरकले नाहीत. काही दुकानांत तुरळक ग्राहक आले, परंतु पाचशे हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास दुकानदारांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. बँका एटीएम बंद असल्याने खर्चासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न अनेक नागरिकांसमोर निर्माण झाला. सकाळपासूनच लहान-मोठ्या सर्व व्यापारी विक्रेत्यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. खिशात पाचशे-हजारांच्या नोटांशिवाय दुसरे पैसे नसल्याने अनेकांची मोठी गैरसोय झाली. ज्यांच्याकडे शंभराच्या नोटा आहेत, त्यांच्याकडून खर्चापुरते पैसे घेण्यासदेखील अनेकांना विनंती करावी लागली. थंडावलेले व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याने व्यापारी वर्गावर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.

ग्राहक माघारी पाठवण्याची नामुष्की
बंद झालेल्या हजार पाचशेच्या नोटा घेऊन काहीजण सकाळीच बाजारपेठेत दाखल झाले, पण दुकानदारांनी या नोटांवर व्यवहार करण्यास नकार दिला. त्यामुळे दारात आलेल्या ग्राहकांना माघारी पाठवण्याची नामुष्की दुकानदारांवर ओढावली. दोन दिवसांत ही परिस्थिती सुरळीत होईल, अशी अपेक्षा दुकानदारांना आहे.

नोटा स्वीकारून ‘व्हाईट’ वसुली
हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्या असल्या, तरी उधारी जमा करताना गुरुवारीही काही व्यावसायिकांनी या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शवली. जवळ असलेल्या नोटा कटवण्यासाठी अनेकांनी उधारी फेडली. व्यावसायिकांनी या नोटा स्वीकारल्यामुळे बुधवारी दिवसभर वसुलीने वेग घेतला. व्यवहार ‘व्हाईट’ दाखवून या नोट्या बदलल्या जातील.

मालमत्ता खरेदीत येणार अडचणी...
एकाने चाळीस लाखांचा बंगला खरेदी केला. २२ लाखांची कायदेशीर खरेदी दाखवून उर्वरित १८ लाख गुरुवारी देण्याचे ठरले होते. जमवलेल्या पैशांत हजार, पाचशेच्या नोटा असल्याने हा व्यवहार अडचणीत आला. एका वेळी अवघे चार हजारच बदलून मिळणार असल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार अडचणीत आले आहेत.

पेट्रोल पंपांवर ग्राहकांची अडवणूक
हजार, पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर स्वीकारल्या जातील, असे निर्देश आहेत. अनेकांनी पाचशे, हजारच्या नोटा घेऊन पंपांवर धाव घेतली. सर्वजण पाचशेच्या नोटा घेऊन आल्याने सुटे पैसे परत देताना पंपचालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे अनेकांना नाइलाजास्तव किमान पाचशे रुपयांचे इंधन भरावे लागले. त्यामुळे चांगलीच बोंबाबोंब झाली.
बाजारपेठ थंडावली
दिवाळीत भाऊबिजेसाठी माहेरी आलेल्या महिलांना नवे कपडे घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे नगर शहर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आठवडाभरापासून मोठी गर्दी झाली होती. बुधवारी सकाळपासून पाचशे एक हजाराच्या नोटा स्वीकारण्यास दुकानदारांनी नकार दिल्याने खरेदीदारांचा हिरमोड झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर अनेकांनी खरेदी करण्याचे टाळणेच पसंत केले. एरवी गजबजलेला नगरचा कापडबाजार, तसेच अन्य बाजारपेठा बुधवारी थंडावल्या होत्या. दुकाने उघडी, पण खरेदीसाठी ग्राहकच येत नव्हते.

केंद्र सरकारचा स्वागतार्ह निर्णय
^मोदीसरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. सर्वसामान्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपला पैसा कुठेही जाणार नाही, तो बदलून मिळणार आहे. या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा बसणार आहे. दोन दिवसांत सर्व व्यवहार सुरळीत होतील. कोणालाही अडचण येणार नाही.'' प्रमोदगुंुडू, मोबाइल व्यावसायिक.

बांधकाम क्षेत्राला काही दिवस बसणार झळ
^या निर्णयाचे चांगले परिणाम होतील, पण जमिनी, फ्लॅट आणि प्लॉट विक्रीच्या व्यवहाराला काही दिवस झळ सोसावी लागेल. रिअल इस्टेटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार लांबणीवर पडणार आहेत. बांधकाम व्यवसायावर या निर्णयाचे परिणाम होणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांना सावरण्यासाठी काही अवधी लागेल.'' अर्शद शेख, वास्तु विशारद.

महापालिकेचा नकार
पाचशे हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याची घोषणा होताच जवळ असलेल्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला. काहींनी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याची शक्कल लढवली. परंतु आयुक्त दिलीप गावडे यांनी पाचशे हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश सर्व प्रभाग समिती कार्यालयांना दिले. त्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले. ज्या मालमत्ताधारकांकडे पाचशे-हजारांच्या नोटा आहेत, त्यांनी त्या नोटा बँकेत भरून महापालिकेला धनादेश द्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

खासगी हॉस्पिटलने नाकारल्या नोटा
रुग्णालयात नोटा स्वीकारण्याचे सरकारचे निर्देश अाहेत, परंतु शहरातील काही खासगी रुग्णालयात अडवणूक करण्यात आली. रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. आरोग्य खात्याने गैरसोय करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणीही काहींनी केली.
बातम्या आणखी आहेत...