आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर शहरातील धार्मिक स्थळांचा तिढा वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रशासनाने केलेल्या शहरातील धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणावर सर्वच पक्षांनी आक्षेप घेतला आहे. एकीकडे सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश, तर दुसरीकडे राजकीय पक्षांचा वाढत्या दबावामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. शहरातील धार्मिक स्थळांचे फेर सर्वेक्षण करण्यात येणार असले, तरी कारवाईचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. पहिल्या टप्प्यात २४ धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंगळवारी २९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शहरात २९ सप्टेंबर २००९ नंतर बांधण्यात आलेली धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करणे महापालिका प्रशासनाला बंधनकारक आहे. धार्मिक स्थळ २००९ पूर्वीचे अधीकृत असल्याचे पुरावे, दिल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नसल्याचे प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. पुरावे सादर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुदत दिली होती. परंतु धार्मिक स्थळ २००९ पूर्वीचे असून तसे पुरावे देण्यास कोणीच पुढे आले नाही. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २४ पैकी धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या होत्या. केडगाव येथील वैष्णवनगर दत्त मंदिर सिव्हिल हडकोमधील जैन स्थानक या दोन धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी पुरावे सादर केेले. उर्वरित धार्मिक स्थळे पाडण्यासाठी प्रशासन तयारीत आहे. दरम्यान, धार्मिक स्थळांवरील ही कारवाई थांबवण्यासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. धार्मिक स्थळांचे दोन दिवसांत फेर सर्वेक्षण करून २९ नोव्हेंबरला त्यावर अंतिम सुनावणी घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. परंतु फेरसर्वेक्षण करूनही धार्मिक स्थळांचे पुरावे समाेर आले नाहीत, तर प्रशासनाची मोठी कोंडी होणार आहे. धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई प्रत्यक्षात सुरू झाल्यास प्रशासनाला नागरिकांच्या राेषाला तोंड द्यावे लागणार आहे. एकीकडे सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश दुसरीकडे सर्व पक्षीय दबाव यामुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे.

नोटिसांची मुदत संपताच पाडणार धार्मिक स्थळे
मनपानेशहरात सर्व्हे करून ५७४ धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. त्यापैकी तब्बल ५७१ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात २४ धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. या धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटिसांची मुदत संपताच ती कोणत्याही क्षणी पाडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. फेरसर्वेक्षणात ही धार्मिक स्थळे २००९ पूर्वीची असल्याचे निदर्शनास आले, तरच पुढील कारवाई टळणार आहे.

फेर सर्वेक्षणातून तोडगा निघेल?
धार्मिक स्थळ २००९ पूर्वीचे असल्याबाबत सबळ पुरावे संबंधितांना द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे हे पुरावे शासकीय अथवा निमशासकीय असणे गरजेचे असल्याचे आयुक्त दिलीप गावडे यांनी स्पष्ट केले. सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश असल्याने आमच्या हातात काहीच नाही, आम्हाला कारवाई करावीच लागेल, असेही गावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे फेरसर्वेक्षणातून काही तोडगा निघेल, याबाबत शंकाच आहे.
बातम्या आणखी आहेत...