आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अधिकाऱ्यांच्या माहितीमध्ये तफावत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-कोपरगाव रस्त्यावरील चौकांच्या विस्तारीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन कार्यकारी अभियंत्यांच्या माहितीत मोठी तफावत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन कार्यकारी अभियंता आर. एस. रहाणे यांनी या रस्त्यावरील सर्व चौकांचे विस्तारीकरण पूर्ण झाल्याचे न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले आहे, तर सहा महिन्यांपूर्वी रस्त्यावरील नागापूर चौकाचे विस्तारीकरण पूर्ण झाले नसल्याचे एका कार्यकारी अभियंत्याने पत्रात नमूद केले आहे. अतिक्रमणांमुळे या ठेकेदार कंपनी चौकांचे विस्तारीकरण करू शकली नसल्याचे वास्तव आहे. मात्र, थेट प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात खोटे बोलण्याइतका निर्ढावलेपणा सार्वजनिक बांधकाम विभागाचा वरिष्ठ अधिकारी करू शकतो, हे या निमित्ताने उघड झाले आहे. 
 
नगर-कोल्हार रस्त्याच्या कामातील त्रुटींविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या सुनावणीच्या वेळी या रस्त्यावरील सर्व चौकांचे विस्तारीकरण पूर्ण झाल्याचे प्रतीज्ञापत्र दिले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या कार्यकारी अभियंत्यांनी नागापूर चौकाचे विस्तारीकरण करून घ्या, असे ठेकेदार कंपनीला पत्र दिले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पत्रांतल्या माहितीची तफावत संशय वाढवणारी असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनीच व्यक्त केले. 
वास्तविक पाहता या रस्त्यावरील सर्व चौकांत अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असल्याचे ‘सुप्रिम’चे म्हणणे आहे. ही अतिक्रमणे काढण्याची जबाबदारीही अर्थातच सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. एकीकडे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करायचे ठेकेदारावर जबाव वाढवायचा, असे ही दुटप्पी धोरणही विभागाचे असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

जलवाहिन्यांच्यागळतीचा फटका 
नगर शहरात नगर-कोपरगाव रस्त्याच्या दुरवस्थेला शहरात शहराबाहेर जलवाहिन्यांच्या गळतीचा मोठा फटका बसत आहे. शिंगवे नाईकपासून महानगरपालिका एमआयडीसीच्या जलवाहिनीतून जवळजवळ प्रत्येक एअर व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत आहे. गळतीचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खराब होतो. बोल्हेगाव फाट्यावर महानगरपालिका काही इतर विभागांच्या जलवाहिन्यांमधून कायम गळती होत असते. सुप्रिम कंपनीने याबाबत अनेकदा कार्यकारी अभियंत्यांकडे या जलवाहिन्या दुरुस्तीची तयारी दाखवल्याची पत्रे दिली आहेत. मात्र, कोणीही या जलवाहिन्यांतील गळतीची जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून या भागातील सुमारे दीडशे ते दोनशे मीटरचा रस्ता कायम खराब झालेला असतो. त्यावर अनेकदा पॅचिंगसारख्या उपाययोजना करून काहीही फायदा होत नाही. समस्या कायम राहते. त्याचप्रमाणे पाइपलाइन रस्ता नगर-कोपरगाव रस्त्याला जेथे मिळतो, तेथेही मनपाच्या जलवाहिनीला कायमच गळती लागलेली असते. त्यामुळे या भागातही रस्ता कायम खराब झालेला असतो, असे ‘सुप्रिम’च्या प्रतिनिधीने सांगितले. (समाप्त)

रस्त्याचे ९९ टक्के पॅचिंग पूर्ण 
नगर-कोल्हारदरम्यान सर्व रस्त्याचे (‌िवळद घाटाची एक बाजू वगळता) पॅचिंग दुरुस्ती पूर्ण झाली आहे, अशी माहिती ठेकेदाराच्या प्रतिनिधीने दिली. लवकरच दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर चांगल्या दर्जाचे नूतनीकरण करण्यात येईल. 

काळ्या मातीचा रस्त्याला फटका 
विळद परिसरात हा रस्ता सुमारे दोन किलोमीटरपर्यंत खोलवर काळी माती असलेल्या भागातून गेला आहे. ही माती वेगवेगल्या ऋतूंत वेगवेगळे गुणधर्म दाखवते. त्यामुळे हा रस्ता कायम ओबडधोबड होतो, असेही ठेकेदाराच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे.