आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नेत्यांना ‘जमिनीवर’ आणणारा विराट मूकमोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोणीही नेता नाही. राजकीय नेते सर्वांत शेवटी. गडबड नाही. गोंधळ नाही. आक्रस्ताळेेपणा नाही. मोर्चात कोणाचेही भाषण नाही. कोणताही अनुचित प्रकार नाही. त्यामुळे लाखोंची गर्दी असून पोलिसांवर विशेष ताणही नाही. मोर्चात सर्वांत पुढे तरुण मुली मग स्त्रिया त्यामागे पुरुष झेंडेकरी, फलकवाले आणि त्यामागे प्रचंड जनसमुदाय, असा लाखोंचा मोर्चा नगरमध्ये निघाला. या मोर्चाची इतिहासात अमीट नोंद झाली आहे. हा मोर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारा नेतृत्वाला जमिनीवर आणणारा ठरणार आहे.
राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून नगर जिल्ह्याची राज्यात ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेचे राजकारणाच्या दृष्टीने विश्लेषण होणे साहजिक असते. नगरचा महाविराट मोर्चा त्याला अपवाद कसा असणार? या मोर्चाचे कारण ठरलेले कोपर्डी अत्याचार खूनप्रकरण जिल्ह्यातच घडलेले असल्याने नगरच्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष होते. जिल्ह्याकडून मोर्चाच्या संख्याबळाबाबतच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या निश्चित पूर्ण, तर झाल्याच पण लाखोंच्या मोर्चाच्या नियोजनाचा आदर्श धडाही या मोर्चाने घालून दिला आहे.

लाखो माणसे शांततेत एकत्र येतात. सोबत काही अंतर चालतात. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर आपण केलेला कचरा आपणच उचलून रस्ता स्वच्छ करतात. आणि जसे शिस्तीत शांततेत आले तसे गावाकडे परततात. ही खरोखरच सामाजिक आंदोलनांची क्रांती आहे. मराठा समाजाकडेच तिचे श्रेय निर्विवादपणे जाते. हा मोर्चा कशासाठी झाला, याची आपापल्या परीने जो तो उत्तरे शोधत आहे. खरे म्हणजे मानवतेला काळिमा फासणारे कोपर्डी अत्याचार प्रकरण घडल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा होऊ लागला. त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठी सामाजिक (व भविष्यात राजकीय?) उलथापालथ झाली आहे. पण, या मोर्चाला फक्त तेच कारण नाही. मराठा समाजाला दाबले जातेय, ही भावना गेल्या दोन दशकांपासून सर्वांमध्ये वाढीला लागली होती. या संदर्भात सोशल मीडियावरील संदेश पाहिले, तर या खदखदीचा अंदाज येतो. ती सर्वांत प्रथम औरंगाबादला बाहेर पडली.

त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात दरवेळी नवे उच्चांक नोंदवणारे मोर्चे झाले. हे मोर्चे शांततेत पार पडले असले, तरी त्यात आंतरविरोध होता. हा विरोध आपल्याला कळसुत्री बाहुल्या सतरंजी उचलणारे कार्यकर्ते बनवणाऱ्या नेत्यांना होता. हाच विरोध दलित-सवर्ण संघर्षाच्या वेळी मतांसाठी वेळप्रसंगी आपल्याच लोकांना बळीचा बकरा बनवणाऱ्या नेत्यांना होता. हाच विरोध एकेकाळी जमीनदार असलेल्या मराठा समाजाला जमिनीच्या छोट्या तुकड्यांवर उपजीविका करताना येणाऱ्या संकटांमुळे आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या व्यवस्थेला होता. आत्महत्या करणाऱ्यांत सर्वाधिक संख्या मराठा शेतकऱ्यांची आहे. यातच काय ते सर्व काही येते. शेती, नोकरी, बेरोजगारी आणि राजकारण यातील अपयश हे या विद्रोहाचे कारण आहे. त्याचा विस्फोट होण्यासाठी कोपर्डीचे प्रकरण निमित्त झाले.

औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, परभणी, बीड, लातूर, नांदेड, जालना, अमरावती, नगर शनिवारी नाशिक अशा मोर्चांनी गर्दीचे सगळे विक्रम मोडीत काढले.त्यातून मराठा समाजात जे चैतन्य निर्माण झाले. त्याने आता उभा महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. या मोर्चांची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे, हे समाजाच्या खऱ्या धुरिणांचे यश आहे.

मुळात कोपर्डी घटना हे मराठा विद्रोहाचे मूळ नाही. या महाराष्ट्रात दीर्घकाळ मराठा सत्ता होती, परवापर्यंत मराठा मुख्यमंत्री होता. आजही विधिमंडळात १४५ आमदार मराठा आहेत, तरीही आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना मराठा समाजात का तयार व्हायला लागली, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.

या मोर्चात नगरची प्रमुख राजकीय मंडळी सहभागी झाली. त्यांत मुंबईतील काँग्रेसचे आमदार भाई जगताप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, शिवाजी कर्डिले, राहुल जगताप, अरुण जगताप, संग्राम जगताप, मोनिका राजळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, अनिल राठोड आदींसह दुसऱ्या फळीतील विक्रम पाचपुते, सुजित झावरे आदींचा समावेश होता. पण, त्यांना कोणीही काहीही किंमत दिली नाही. जेथे मोर्चाचे सर्व आयोजन झाले, त्या ओम गार्डनमध्ये गुरुवारी सायंकाळी बहुतेक सर्व नेते जाऊन बसले होते. पण, त्यांना कोणीही विचारत नव्हते. एरवी कार्यकर्त्यांच्या कोंडाळ्यात वावरणाऱ्या नेत्यांची अवस्था त्यामुळे अतिशय केविलवाणी झाली होती. मोर्चाच्या दिवशीही यांतील काहींनी समारोपस्थळी असलेल्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केल्यावर लोकांनी त्यांना खाली उतरण्यास भाग पाडले. यावरून त्यांनी आपली समाजात काय किंमत राहिली आहे, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजभावनेचा त्यांना आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. राजकीय सभांसाठी भाड्याने लोक आणण्याची वेळ या लोकांवर नेहमी येते. परंतु, स्वयंस्फूर्तीने लाखांनी येऊन अत्यंत शिस्तबद्धपणे आपला निषेध व्यक्त करणाऱ्या समाजानेच कोणतीही गोष्ट हातात घेतली, तर काय होऊ शकते, याची कल्पना एव्हाना या नेत्यांना आली असेलच. त्यांनी खरोखरच समाजासाठी गांभीर्याने काही केले नाही, तर त्यांना पालापाचोळ्यासारखे भिरकवून देण्यास समाज कचरणार नाही, हा संदेश या मोर्चाने त्यांना दिला आहे. नगरच्या मोर्चानंतर त्यांची स्थिती ‘तारे जमीं पर’ अशी झाली आहे.

नगरच्या मोर्चात इतर समाजांचाही चांगला सहभाग होता. विशेषत: मुस्लिम समाजाने अनेक ठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी चहा, पाणी नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यांच्याशिवाय पंजाबी, जैन, माळी इतर समाजांनीही आपापला वाटा उचलला. सामाजिक सौहार्दाचे हे उदाहरण आदर्श निर्माण करणारे ठरावे. मोर्चातील त्यांचा काही प्रमाणात सहभागही चर्चेचा ठरला.
या मोर्चाने काय साधले, हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट असलेल्या मागण्या अधिक जोरकसपणे मांडण्यात आल्या. मोठ्या संख्येमुळे त्यांना अधिक बळ तर मिळालेच, पण जिल्ह्यात मराठा समाजाची ताकदही दाखवून देण्यात संयोजकांना यश आले आहे. या मोर्चात सहभागी झालेल्यांत प्रामुख्याने अॅट्रॉसिटीच्या गैरवापराबद्दल संतप्त भावना होत्या. गावपातळीवर राजकीय जिरवाजिरवीसाठी या कायद्याचा गैरवापर वाढल्याचे मोर्चातील अनेकांचे म्हणणे होते. यापुढे या कायद्याचा स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करणाऱ्यांना या मोर्चाने चाप लागण्याची शक्यता वाढली आहे. या मोर्चात ऐनवेळी बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याची मोठी चर्चा होती. तसे काही घडले नाही. आपल्या दैवताबद्दल विकृत लेखन करणाऱ्या जेम्स लेनला पुरंदरेंनी मदत करण्याबद्दल अत्यंत संतप्त भावना समाजात आहे, तरीही त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन जखमेवर मीठ चोळल्याची भावना मराठा समाजात सुप्त ज्वालामुखीसारखी धगधगत आहे. याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे भविष्यात या मोर्चाची ताकद मोठ्या राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरली, तर आश्चर्य वाटू नये.
बातम्या आणखी आहेत...