आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-पुणे थेट रेल्वेगाडी सहा महिन्यांत सुरू करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणेस्वतंत्र रेल्वेगाडी सहा महिन्यांत सुरू होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू. नगर-पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आवश्यक कॉडलाइनचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू अाहे, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी नगर-पुणे रेल्वे कृती समितीच्या सदस्यांना दिली.
नगर-पुणे थेट रेल्वे सेवेसाठी नुकतीच कृती समितीची स्थापना करण्यात आली. नगरहून पुण्यासाठी स्वतंत्र गाड्या सुरू व्हाव्यात, यासाठी ही समिती काम करणार आहे. पहिला टप्पा म्हणून समितीच्या सदस्यांनी मंगळवारी खासदार गांधी यांना निवेदन दिले. गांधी यांनी आपणही या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्रातील रेल्वेच्या मागण्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देतात. आपण केंद्रीयमंत्री असताना तेही मंत्री होते. तेव्हापासून त्याच्याशी मधूर संबंध आहेत. या संबंधांचा नगरच्या रेल्वेबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी मोठा उपयोग होत आहे. रेल्वे मंत्रालयात महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प मार्गी लागतील, अशी आशा गांधी यांनी व्यक्त केली.
कॉडलाइनबद्दल बोलताना गांधी म्हणाले, ही लाइन रेल्वेने मंजूर केली आहे. तीन किलोमीटरच्या या मार्गासाठी १८ कोटीं मंजूर झाले आहते. रेल्वेकडे रूळ, स्लीपर्स खडी हे साहित्यही उपलब्ध आहे. फक्त अधिकारी बदलल्याने या प्रकल्पाला उशीर झाला. कॉडलाइन पूर्ण झाल्यावर नगर-पुणे अंतर अवघ्या सव्वादोन तासांवर येईल. त्याचा नगरकर पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कॉडलाइन लवकर पूर्ण होण्यासाठी मी दबाव वाढवणार आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा, उपाध्यक्ष अर्शद शेख, सल्लागार मिलिंद बेंडाळे, सदस्य डॉ. संजय आसनानी, अशोक कानडे, एस. बी. रुणवाल, धनेश कोठारी, सय्यद साबिरअली, संजय सपकाळ, विपुल शहा, सुनील छाजेड, अजय दिघे, किरण भंडारी, जसमितसिंग वधवा उपस्थित होते.
सुरुवातीला वधवा म्हणाले, पुणे रस्त्यावर सातत्याने वाढत असलेल्या वाहतुकीमुळे सातत्याने कोंडी होते. त्यामुळे नगर-पुणे प्रवासाचा वेळ तीन तासांहून अधिक झाला आहे. अपघातांची संख्याही वाढली आहे. सध्या हा मार्ग चौपदरी आहे. मात्र, तो कमी पडत आहे. या रस्त्याचे अधिक रुंदीकरण आता शक्य नाही. त्यामुळे सध्याच्या रेल्वेमार्गावरच नगर-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू केल्यास इंधनाची बचत, तर होईलच शिवाय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला नोकरदार वर्गाला सुरक्षित प्रवास करता येणार आहे, अशी वधवा यांनी भूमिका मांडली. नंतर कृती समितीच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नगरचे स्टेशन व्यवस्थापक ए. यू. पाटील यांनाही दिले. त्यांनीही अशी रेल्वे सेवा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

नगर रेल्वे स्टेशनचा विकास सुरू
खासदार दिलीप गांधी म्हणाले, जिल्ह्यात रेल्वेसेवेच्या विकासासाठी दौंड-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. नगर स्टेशन स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. रेल्वेस्टेशन टपरीमुक्त करण्यासाठी बाहेरच्या बाजूने गाळे बांधून ते विक्रेत्यांना देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व परिसर सुंदर करण्यासाठी काम सुरू आहे. नगर स्टेशनवर एस्केलेटरचे जिनेही लवकरच बसणार आहेत.

नगर-पुणेदरम्यान रेल्वेगाडी सुरू व्हावी, तसेच या प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी कॉडलाइनचे काम सुरू करावे, या मागण्यांचे निवेदन खासदार दिलीप गांधी यांना मंगळवारी देताना नगर-पुणे रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा. समवेत अर्शद शेख, डॉ. संजय आसनानी आदी. छाया : वाजिद शेख

विद्युतीकरणाने कमी होणार वेळ
मनमाड-दौंडमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-दौंड मनमाड-दौंड मार्गातील विद्युतीकरणाच्या चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. आता लवकरच या मार्गावरून विद्युत इंजिनाच्या रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात करणार आहेत. त्यामुळेही पुणे-नगर प्रवासाला लागणाऱ्या वेळेत किमान १५ मिनिटांची बचत होईल. या मार्गावरून सध्याच्या स्थितीत मुंबई पुण्याप्रमाणे लोकल सुरू होणे शक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...