आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाहाटा प्रकरण : फिर्यादीच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह;चक्रावून टाकणारी माहिती उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - नाहाटा यांच्याविरुद्ध महिलेने दिलेल्या बलात्काराच्या फिर्यादीचा निषेध करण्यासाठी व नाहाटांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सर्मथकांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुकारलेला बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.

नाहाटांवरील खोटा गुन्हा पोलिसांनी राजकीय दबावापोटी दाखल केल्याचा सर्मथकांचा आरोप होता. हा गुन्हा मागे घेण्यात यावा, फिर्यादी महिलेने कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले याची चौकशी व्हावी, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल होणार्‍या फिर्यादीची आधी सत्यता पडताळून पहावी, अशी मागणी नाहाटा सर्मथकांची होती. कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप, श्रीगोंदे कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य डी. एम. भालेराव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर व काँग्रेसचे नगरसेवक यांनी बंद यशस्वी झाल्याचा दावा करत श्रीगोंदेकरांना या प्रकरणी धन्यवाद दिले.

खोट्या फिर्यादी दाखल करून विरोधकांना छळण्याचा धंदा पोलिस येथून पुढे करणार नाहीत, अशी आशा वाटते, अशा शब्दांत प्रा. दरेकर यांनी ‘दिव्य मराठी’कडे प्रतिक्रिया दिली.

बंदमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. नेहमी गजबजणारे रस्ते निर्मनुष्य झाले होते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका सुरू होत्या. मात्र, तेथे गर्दी नव्हती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. बंद पाळण्यात आल्यानंतर काँग्रेसतर्फे शहरभर जनतेचे आभार व्यक्त करणारी ध्वनिफित भोंग्याद्वारे ऐकवण्यात येत होती. सायंकाळी काँग्रेस कार्यालयात नाहाटा सर्मथकांनी ‘निषेध सभा’ घेतली. त्यास सुमारे एक हजार कार्यकर्ते उपस्थित होते.