नगर - चित्रपट अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या "नाम' संस्थेने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना अार्थिक मदत देत त्यांच्या पाठीवर गुरूवारी मायेचा हात फिरवला. जिल्हाभरातील ११२ कुटुंबांना प्रत्येकी पंधरा हजारांची मदत या संस्थेने दिली. नाना मकरंद यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत त्यांना धीर दिला. अात्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांनी आपल्या अश्रूंना यावेळी वाट मोकळी करून दिली. आपल्या कुटुंबाला उघड्यावर टाकत आत्महत्यासारखा निर्णय कधीच घेऊ नका, असे भावपूर्ण आवाहन यावेळी या महिलांनी केले.
नंदनवन लॉनमध्ये दुपारी झालेल्या या कार्यक्रमास फारशी गर्दी नव्हती, परंतु अनेक दुष्काळग्रस्त कुटुंबे मोठ्या आशेने या कार्यक्रमास हजर होती. नाना मकरंद यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचे दु:ख जाणून घेतले. अनेक महिलांनी अापल्या जीवनातील लढा मांडला. नानांनी त्यांची दु:ख अडचणी समजून घेतल्या. काही महिलांना नोकरीचा शब्द, तर काहींच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याचे वचन त्यांनी दिले. काही उच्चशिक्षित महिलांनी नोकरीची मागणी केली. एमए, डीएड असलेली एक महिला मोठ्या अापुलकीने नानांकडे आली. घरात मी एकटीच कमावती असल्याने मला नोकरीची नितांत गरज असल्याचे तिने सांगितले. एवढे म्हणताच "झाले काम'असा शब्द नानांनी दिला. नानांनी शब्द देताच ती रडायला लागली. नानांनी वडिलांच्या नात्यानं तिला जवळ घेत अाशीर्वाद दिले. घाबरू नका, संकटांना मोठ्या धिराने तोंड द्या, अशी भावनात्मक साद नानांनी उपस्थित महिलांना घातली. एका उच्चशिक्षित महिलेने सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी पतीने आत्महत्या केली. परिस्थितीमुळे दोनच महिन्यांत कामाला लागले. दोन एकर शेतीत एकटीनेच कांदा लावला, परंतु आता कांद्याला योग्य भाव मिळतो की नाही, ही चिंता आहे. नानांनी या महिलेच्या जिद्दीचे कौतुक केले. प्रत्येक महिलेचे दु:ख अडचणी नानांनी वडिलकीच्या नात्याने समजून घेतल्या. त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
आम्हाला देवत्व देऊ नका...
दुष्काळग्रस्तांनामदत देण्यासाठी यावे लागते, याचे मोठे वाईट वाटते. मुळात अशी वेळच यायला नको होती. एकमेकांसोबत राहून आयुष्य सोपे करू. यंदा नक्कीच चांगला पाऊस पडेल. "नाम'ला तुम्ही खूप मोठे केले. आम्हाला देवत्व देण्याचाही प्रयत्न होत आहे, परंतु असे करू नका. आम्हीदेखील तुमच्यासारखीच माणसं आहोत. आमचे काही चुकत असेल, तर प्रसारमाध्यमांनी आमचे कान धरायला विसरू नये. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचे कामही चांगले सुरू आहे. तुमच्या जिल्ह्यातील भापकर गुरूजींनी एकट्याने ४० िकलोमीटरचा रस्ता तयार केला. खरे हीरो तर तेच आहेत, मग कशा आयपीएल पाहता? नाम संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना केलेल्या मदतीची आकडेवारी महत्त्वाची नाही. "नाम' म्हणजे सामान्य माणसांनी सामान्य माणसांसाठी चालवलेली चळवळ आहे. प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा. शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागाची काळजी नाही, असे कृपया समजू नका. "नाम'ला शहरातील लोकांनीच मदत दिली. ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत. मी मंदिरात आवर्जून जात नाही. निसर्ग हाच माझ्यासाठी देव आहे. मंदिरात महिला पुरूषांना समान प्रवेश पाहिजे. मुळात हा वादच विचित्र आहे, असे नाना पाटेकर म्हणाले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी नाना पाटेकर यांनी संवाद साधला.
कर्जमाफीसाठी सुवर्णमध्य हवा
शेतकऱ्यांनाकर्जमाफी मिळायला हवी, परंतु त्यातील निकष बदलायला हवेत. दोन एकर शेती असलेल्यांलानाही कर्जमाफी मिळते आणि दोनशे एकर शेती असणाऱ्यांनाही कर्जमाफी मिळते. त्यामुळे कर्जमाफी देण्यासाठी सरकारने निकष बदलले पाहिजेत. ज्यांना खरी गरज आहे, त्यांना कर्जमाफी मिळायलाच हवी, असे नाना पाटेकर म्हणाले. शेततळ्यांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
"नाम'कडे मदतीचा ओघ सुरूच
नामसंस्थेकडे आतापर्यंत तब्बल ३५ कोटींची मदत जमा झाली आहे. त्यातून हजार ८१२ कुटुंबांना अार्थिक मदत देण्यात आली आहे. नगर शहरातूनही नाम संस्थेला मोठी मदत मिळाली. विद्यार्थी, सर्पमित्र, विविध संघटनांचे कार्यकर्ते महिलांनी जमेल तेवढी मदत दिली. तेजश्री खोडदे या मुलीने तर स्वत:साठी साठवलेल्या दीड हजार रूपयांची मदत नानांकडे दिली. ही मदत रिलायन्सच्या शंभर कोटींपेक्षा अधिक मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले.