आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामदेव ढसाळांच्या निधनाने हेलावले साहित्यविश्व, दलित साहित्याची अपरिमित हानी झाल्याची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रख्यात कवी, विचारवंत व ‘दलित पँथर’चे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगर जिल्ह्यातील सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्र हेलावले. साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा व वेदनांना वाचा फोडणारा, चळवळीच्या माध्यमातून दलितांना खरे आत्मभान देणारा नेता हरपला, अशा शब्दांत शोक व्यक्त करण्यात आला.

माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले, ढसाळ माझे अत्यंत आवडते कवी व मित्र होते. साठीनंतरच्या चळवळीतील ते बंडखोर कवी होते. त्यांनी दलित साहित्याला वेगळा आयाम दिला. मध्यमवर्गीय कल्पना करु शकणार नाही असे आयुष्य ते जगले. त्यातूनच बंडखोरी आली व त्यांनी ती बिनधास्तपणे मांडली. कविता कोणीही करतो, पण ढसाळांची कविता क्रांतिकारक होती. कारण ती आतून येत होती. दि. पु. चित्रे यांनी ढसाळांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता. त्यावेळी ढसाळांना बर्लिनला जाण्यासाठी यशवंत प्रतिष्ठानने खारीचा वाटा उचलला. गेल्या वर्षी सोनईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ कवी गुलजार यांना मी ढसाळांचा ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह भेट दिला. त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

लेखक संजय कळमकर म्हणाले, ढसाळ यांनी दलित पँथर चळवळीतून दलित साहित्यात आमूलाग्र बदल केला. त्यांच्या नावावर ‘गोलपीठा’सारखे व्यवस्थेविरोधात बंड करणारे मोजके कवितासंग्रह आहेत. त्यातील जळजळीत वास्तवाने दलित साहित्याला एक वेगळे आयाम दिले. आपल्या धीट प्रतिभाशक्तीचा उपयोग त्यांनी फक्त साहित्यनिर्मितीसाठी न करता दलित पँथरच्या चळवळीला एक निश्चित दिशा देण्यासाठीही केला. त्यांच्या जाण्याने सामाजिक भान असलेला आधारस्तंभ गेल्याची भावना मनात दाटली आहे.

चित्रकार र्शीधर अंभोरे म्हणाले, ढसाळ हे विद्रोही विचारसरणीचे कवी होते. ते उच्च दर्जाचे चित्रकार व भटक्या विमुक्त माणसांची तळमळ असणारे लेखकही होते. त्यांच्या शब्दांमध्ये परिवर्तनीय विचारसरणीची छटा होती. समाजातील अत्याचारित घटकांविषयी विचार करणारे ते कवी होते. समाजाविषयी व देशातील शेवटच्या घटकांविषयी विचार करणार्‍यांपैकी ते होते. त्यांच्या जाण्याने दलित साहित्याची अपरिमित हानी झाली आहे.

कवी लहू कानडे म्हणाले, माझ्या काव्यलेखनावर संत तुकाराम, नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळ यांचा प्रभाव आहे. तुकाराम मला साहित्यात, नारायण सुर्वे संमेलनात, तर ढसाळ चळवळीत भेटले. त्यांच्या ‘गोलपीठा’, ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’ व ‘तुही यत्ता कंची’मधील कवितांनी माझ्यावर खोल संस्कार केले. नोकरीनिमित्त मुंबईत असताना ढसाळ हा मोठा माणूस व मित्र असल्याचे अनुभवले. ‘रसाळ नामदेवापासून ढसाळ नामदेवापर्यंत मराठी कविता’ हा समीक्षकांचा वाक्प्रचार ते मराठी काव्य प्रांतातील मैलाचा दगड असल्याचा पुरावा आहेत.