आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडे यांना गड हवा आहे की आशीर्वाद?; नामदेवशास्त्री यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - ‘कोणत्याही धर्मपीठावर राजकारण्यांनी अधिकार गाजवू नये. धर्मपीठ पवित्र असते. राजकारणी कसे असतात, हे सर्वांना माहिती आहे. भगवानगडाचा महंत आजीवन ब्रह्मचारी असतो, हे पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांना बहुधा माहीत नसावे. त्यांना भगवानगड हवा आहे, की गडाचा आशीर्वाद?’ असा सवाल भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी केला. भगवानगडावरील दसरा मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या भाषणाला विराेध करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेली ही बातचीत...

- पंकजा यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांची वारस तुम्हीच जाहीर केले होते. त्यांच्या भाषणांना तुम्ही विरोध केला नाही. मग पंकजांनाच विराेध का?
नामदेवशास्त्री : मी कधीही पंकजाला मुंडेंचा राजकीय वारस म्हणून जाहीर केले नाही. ती गडाची लेक आहे. येथे येण्यासाठी तिला कोणालाही विचारण्याची गरज नाही. गोपीनाथरावांना अधिष्ठान नव्हते. म्हणून गडाने त्यांना मदत केली. पंकजाने १२ डिसेंबर २०१५ रोजी गोपीनाथगडाची स्थापना केली. त्या वेळी तिनेच गोपीनाथगड हा राजकारणाचा व भगवानगड हा श्रद्धेचा, असे जाहीर केले होते. आपल्या शब्दाप्रमाणे तिने तेथे राजकारण करावे व श्रद्धेसाठी भगवानगडावर यावे. या वादाच्या पार्श्वभूमीसाठी गडाचा इतिहास समजून घ्या. १९५१ मध्ये दसऱ्याला भगवानबाबांनी हा गड स्थापन केला. हा गड वारकरी पंथाचे सर्व जातींसाठीचे आध्यात्मिक व्यासपीठ आहे. भगवानबाबांनी १९६५ पर्यंत प्रबोधनाची परंपरा चालवली. त्यानंतर राजपूत समाजाचे भीमसेन महाराज यांनी ३९ वर्षे ती जपली. ही गादी कोणत्याही एका समाजाची नाही. १९९३-९४ दरम्यान गोपीनाथ मुंडे येथे आले. इतरांप्रमाणे हळूहळू तेही बोलू लागले. मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी मंत्री बबनराव ढाकणे व त्यांच्यात वाद झाला. तिथपासून हा वाद सुरू आहे.

- गोपीनाथगड नसता, तर पंकजांना गडावर भाषणास परवानगी दिली असती का?
नामदेव शास्त्री : भगवानगड ही स्वायत्त संस्था आहे. इथे काय करायचे, याचे सर्वाधिकार विश्वस्तांना आहेत. राजकीय वादातून गडाच्या महंतांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर विश्वस्तांनी या वर्षीपासून गडावर राजकीय भाषणांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येथून पुढे गडावर कीर्तनकाराशिवाय कोणालाच बोलू दिले जाणार नाही. गडाचे आध्यात्मिक पावित्र्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याला भक्तांची मान्यता आहे.

- पंकजांच्या भाषणाला विरोध करण्यासाठी तुमच्यावर दडपण तर नाही ना?
नामदेवशास्त्री : असे कोणतेही दडपण नाही. हा विश्वस्तांचा निर्णय आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे.

- तुम्ही पद सोडावे अशी पंकजा समर्थकांची मागणी आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
नामदेवशास्त्री : भगवानगडाचा महंत आजीवन ब्रह्मचारी असतो, हे पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांना बहुदा माहिती नसावे. त्यांना गड हवा की गडाचा आशीर्वाद? हे त्यांनी ठरवावे. नगर पालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातील इच्छुकांनी घातलेला हा गोंधळ आहे.

- गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस कोण? या कौटुंबिक लढाईत गडाचा वापर होतोय अशी सर्वसामान्यांची भावना आहे?
नामदेवशास्त्री : मुंडे घराणे परळी येथील आहे. त्यांच्या वारसाबाबत परळीकरांनी निर्णय घ्यायचा आहे. कौटुंबिक वादात गडाचा वापर होतो, हे म्हणणेच चुकीचे आहे. कारण मुंडेंच्या कौटुंबिक वादाच्या आधीपासून गड अस्तित्वात आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

- भगवानगडावर भाषण करायचेच असे पंकजा व त्यांच्या समर्थकांनी ठरवलेच असेल आणि तसा प्रयत्न झाला तर तुमचे पाऊल काय असेल?
नामदेवशास्त्री : कायदा व सुव्यवस्था हे सरकारचे काम आहे. मी सर्व प्रशासनावर सोडले आहे. गडाने राजकीय भाषणांबद्दल घेतलेल्या निर्णयाचे पंकजाने पालन करावे. नियम तोडू नयेत. दादागिरी करू नये. गडाचा आदेश मान्य करावा.

- तुमच्या या भूमिकेबाबत धनंजय मुंडे यांचे समर्थन आहे का? या विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली आहे का?
नामदेवशास्त्री : या निर्णयाशी धनंजय मुंडे यांचा काहीही संबंध नाही. याबाबत आपली त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पंकजा सत्तेत असताना तिला येथे बोलण्यास विरोध करत आहे, तर धनंजय मुंडे यांना मी येथे कसा बोलू देईन?

- सर्वसामान्य भाविकांना काय वाटते हे तुम्ही जाणून घेतले आहे का? त्याचे निष्कर्ष काय?
नामदेवशास्त्री : माझ्या भूमिकेशी सर्वसामान्य भाविक पूर्णत: सहमत आहेत. गडावर राजकीय भाषणे नकोत, अशीच त्यांची भावना आहे.

- एेनवेळी मधला मार्ग निघेल का?
नामदेवशास्त्री : भगवानगडाचे कुंपण सोडून खाली पंकजाने सभा घ्यावी. या आधीही आचारसंहिता असताना गोपीनाथ मुंडे यांनी दोन वेळा अशी सभा घेतली होती. गडापासून एक फर्लांगवर पंकजानेही सभा घ्यावी. माझा तिला पाठिंबाच असेल.

- सर्वसामान्य भाविकांना तुम्ही काय आवाहन कराल?
नामदेव शास्त्री : सर्वांनीच गडाच्या नियमांचे व कायद्याचे पालन करावे, असे मी आवाहन करत आहे.
बातम्या आणखी आहेत...