आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना "गुरुजीं'नी घेतला महापौर अभिषेक कळमकर यांचा तास...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भल्याभल्यांची बोलती बंद करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी महापौर अभिषेक कळमकर यांचा गुरूवारी तास घेतला. "तू महापौर आहेस... किती वय आहे तुझे... किती शिक्षण झाले... तुझे उत्पन्न किती...' अशी प्रश्नांची सरबत्तीच नानांनी महापौरांवर केली. नानांच्या अनपेक्षित प्रश्नांच्या भडिमाराने महापौरांची अक्षरश: बोलतीच बंद झाली. तुमचे उत्पन्न किती, असा प्रश्न नानांनी विचारताच महापौर कळमकर विचारात पडले. कसेबसे आठवत आपले वार्षिक उत्पन्न अडीच लाख रूपये असल्याचे त्यांनी सांगितले. नानांनी त्यांची फिरकी घेतली, तथापि कमी वयात महापौर झाल्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली.
नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या वतीने नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना गुरूवारी मदत देण्यात आली. नंतर नाना पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषद सुरू असतानाच महापौर त्यांना भेटण्यासाठी आले. नानांना कुणीतरी सांगितले, नगरचे महापौर आले आहेत. नानांनी इकडे तिकडे पाहिले. महापौरांबरोबर काही कार्यकर्ते नगरसेवक असल्याने नेमके महापौर कोण ते नानांना कळेना. अखेर कोवळ्या वयाचा मुलगा शहराचा महापौर असल्याचे पाहून नानांना सुखद धक्का बसला. महापौर पुढे येताच नाना म्हणाले, "तू महापौर आहेस? ये ये...कोणत्या पक्षाचा आहेस?' नंतर नानांना महापौरांची फिरकी घ्यावीशी वाटली. किती वय आहे तुझे... किती शिकलास? असे विचारत थेट तुझी कमाई किती आहे, असा बाऊन्सरच त्यांनी महापौरांवर टाकला. नानांच्या या बाऊन्सरमुळे महापौरांची चांगलीच तारांबळ उडाली. नेमके किती उत्पन्न सांगावे ते महापौरांना कळेना. त्यात समोर सर्व पत्रकार बसलेले. अखेर अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यावर नानांसह सर्वच उपस्थित हसायला लागले.

महापौरांनी नानांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे दिली. शेवटी नानांनी महापौरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शहरासाठी चांगले काम करा, असे सांगत हा तास संपवला.
अभिनेते नाना पाटेकर यांनी गुरूवारी महापौर अभिषेक कळमकर यांची चांगलीच हजेरी घेतली. ते पाहून मकरंद अनासपुरे इतर अवाक् झाले.

होम मिनिस्टरांकडून महापौरांना पेन भेट
महापौरांचा तास घेताना नानांचे लक्ष अचानक महापौरांच्या खिशातील पेनकडे गेले. तुझे उत्पन्न काहीच नाही, मग एवढा महागडा पेन कसा, असा प्रश्न नानांनी विचारला. हा पेन वाढदिवसाची भेट म्हणून मिळाला असल्याचे महापौर कळमकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही भेट त्यांच्या होम मिनिस्टर प्राची कळमकर यांच्याकडून मिळाली असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. महापौरांच्या उत्तराने नाना खूश झाले. चांगले काम करं, असा प्रेमाचा सल्ला त्यांनी दिला.