आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरबळीच्या दहशतीने अंगणवाडी पडली ओस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नेवासे तालुक्यातील वांजोळी येथे 24 मेच्या रात्री नरबळी देण्याचा प्रयत्न भजनी मंडळ व जागरुक ग्रामस्थांनी हाणून पाडला. परंतु या प्रकाराची दहशत लहान मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या मनात बसली आहे. तेव्हापासून गावातील अंगणवाडीतील मुलांची संख्या रोडावली आहे. नरबळीचे प्रकरण ‘अर्थपूर्ण’ पद्धतीने दडपणार्‍या गावातील एका पुढार्‍याच्या दहशतीमुळे घटनेचे साक्षीदारही भीतीच्या सावटाखाली आहेत.
24 मेच्या रात्री किशोर खंडागळे यांच्या शेतातील पिंपळाच्या झाडाखाली नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. जवळच असलेल्या मारुतीच्या मंदिरात भजन सुरू होते. भजनी मंडळींना झाडाखाली काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी झाडाखाली धाव घेतली असता गावातील हिवरे नावाचा मांत्रिक (मूळ रा. धुळे), गावातील एक गिरणीचालक व त्याची पत्नी, लोहोगावातील एक प्रतिष्ठित दुकानदार व एक विधवा महिला, पांढरी पूल येथील एकजण, तसेच अन्य 8-10 मांत्रिक तेथे अघोरी पूजा करत होते.
भजनी मंडळींना पाहून दोन्ही महिला व मांत्रिकांनी तेथून पळ काढला. भजनी मंडळींनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ आले. त्यांनी काही लोकांना पूजेच्या साहित्यासह पकडले. या सर्वांना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. हा प्रकार गावातल्या एका पुढार्‍याला समजला. त्याने सोनई पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर ग्रामपंचायतीत कोंडलेल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण पुढार्‍याने ‘अर्थपूर्ण’ तडजोड करुन हे प्रकरण मिटवले. त्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ बोलायला तयार नाहीत.
‘दिव्य मराठी’च्या आवाहनानंतर काहीजणांनी या प्रकाराबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही धमक्या यायला सुरूवात झाली आहे. या प्रकाराला पंधरा दिवसानंतर वाचा फुटली असली, तरी सोनई पोलिसांनी अद्याप कोणताच गुन्हा दाखल केलेला नाही. अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी गावात भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही फारसे यश आले नाही. गावातील पालक आता मुलांना घराबाहेर जाऊ द्यायलाही घाबरत आहेत.