आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Divya Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

सभा मोदींची.. हर डगर, हर गली, नमो..नमो..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मोदींच्या सभेची जाहीर केलेली वेळ अडीचची. साडेचारच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सभास्थानी आले. हेलिकॉप्टर पाहिल्यावर उपस्थितांत प्रचंड उत्साह संचारला. मोदी यांचे व्यासपीठावर एकदम जोशात स्वागत झाले. अपेक्षेप्रमाणेच मोदी यांनी काही वेळातच सभा जिंकली. ते आले..त्यांनी पाहिले..त्यांनी जिकले.., अशी एकूण स्थिती होती. राजकीय सभेचे विक्रम मोदींच्या या सभेने मोडले. ही गर्दी किती प्रमाणात मतांत परावर्तित होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


मोदींची नगरमध्ये येण्याची अधिकृत वेळ तशी साडेचारची होती. त्याआधी जिल्ह्यातील नेत्यांनी भाषणे करत आघाडी सांभाळली. खरे, तर मोदी येणार नाहीत. ऐन वेळी सभा रद्द होणार, अशा अफवा शुक्रवारपासूनच मुद्दाम पसरवल्या जात होत्या. त्यामागे कोण होते, हे स्पष्ट करण्याची गरज नाही. मोदींचे आगमन झाल्यावर उमेदवार खासदार दिलीप गांधी यांनी पुन्हा एकदा माईकचा ताबा घेतल्यावर सर्वांत प्रथम या बाबींचा उल्लेख केला. मोदी आल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचेही त्यांच्या भाषणातून जाणवत होते.


मोदींनी आपले भाषण करताना उपस्थितांना अजिबात निराश केले नाही. सुरुवात मराठीत करून त्यांनी उपस्थिांची मने जिंकली. त्यानंतर संवाद साधत सभा सजीव केली. उपस्थितांना त्यांनी प्रश्न विचारत आपले मत मांडण्याचे आवाहन केले. त्याआधी नेत्यांनी उपस्थित केलेल्या शेती व पाण्याच्या प्रश्नाबरोबरच त्यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार, राज्य व केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी केलेले घोटाळे यांबद्दल सरकारवर कोरडे ओढले. मात्र, त्यांचा सूर तसा संयमाचा होता. अत्यंत मुद्देसूद व जमावाकडून प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची त्यांची शैली उपस्थितांसाठी नवीन ठरली. त्यांच्या भाषणाआधी नेत्यांची भाषणे झाली.


नगरबद्दल शब्दही नाही
आमदार अनिल राठोड, राम शिंदे, शिवाजी कर्डिले, विजय औटी, श्याम जाजू आदी नेत्यांनी आपल्या भाषणात शेती, शेतकरी व पाणी प्रश्न याबद्दल आवाज उठवला. मात्र, ज्या नगर शहरात सभा झाली, त्या शहराच्या विकासातील अडचणी, समस्या, बेरोजगारी, दळणवळणाचे प्रश्न याबद्दल चकार शब्दही काढला नाही. यावरून त्यांना जिल्ह्याचे स्थान असलेल्या नगर शहराबद्दल किती आस्था आहे, हे स्पष्ट होत होते.

महिलांची संख्या लक्षणीय
प्रचंड उन्हाच्या वेळी सभा असूनही सभेला आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेक महिला, तर आपल्या लहान मुलांनाही राजकीय सभेला घेऊन आल्या होत्या, हे दृष्य विरळे होते. शहराबरोबरच मैदानाकडे जाणारा रस्ता तसा लहान असतानाही व तरुण कार्यकर्त्यांचे प्रमाण मोठे असतानाही कोठेही हुल्लडबाजीचे गालबोट लागले नाही. कारण पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता.

बाळासाहेब विखेंनीच मला पाडले : आठवले
दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी महाराष्ट्रात यावे, असे मला त्यांनी निमंत्रण दिले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पाडण्यासाठीच मला महाराष्ट्रात बोलावण्यात आले व त्यांनीच मला पाडले, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. यावेळी त्यांनी काव्यात्मक चारोळ्या ऐकवून त्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.

मोदींमुळे पवार-चव्हाण दचकून उठतात
काँग्रेस - राष्ट्रवादीने मोदी यांचा धसका घेतला आहे. मोदी यांच्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रात्री दचकून उठतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, धनगर समाज आरक्षण व विकासाच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मोदींबद्दल प्रचंड उत्सुकता
गर्दीच्या आकड्यांबद्दल अनेकांकडून विविध दावे केले जात होते. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सभेला तीन ते चार लाख लोक आल्याचा दावा केला. मात्र, 15 एकरावर इतके लोक मावणे शक्य नसल्याने सुमारे दीड ते पावणेदोन लाख लोक सभेला आल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. शहरात अनेक वर्षांनी अशी दणकेबाज सभा झाली. नगर शहरासह, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, राहुरी, पारनेर आदी नगर मतदार संघातील तालुक्यांबरोबरच शिर्डी मतदार संघातूनही अनेक लोक सभेला आले होते. नगरबरोबरच बीड जिल्ह्यातील आष्टी, कडा भागातूनही लोक मोदींना पाहण्याच्या व ऐकण्याच्या उत्सुकतेपोटी सभेला आले होते. जिल्हाभरातून लोक बारा-साडेबारापासूनच प्रोफेसर कॉलनी भागातील संत निरंकारी भवनाशेजारच्या मैदानात जमू लागले. शहरातील सर्व रस्ते जणू सभास्थानाकडे जात होते. पोलिस बंदोबस्तही अभूतपूर्व होता. इतकी गर्दी जमूनही सभा शिस्तीत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, याचे सर्व र्शेय पोलिसांना द्यावे लागेल.