आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Nationalist Congress, Sharad Pawar

मोदी लाटेच्या धसक्याने ‘राष्ट्रवादी’चे दौरे वाढले, पवारांची प्रतिष्‍ठा पणाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा चांगलाच धसका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार व वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. नगर मतदारसंघातील उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी पवार तिसर्‍यांदा जिल्ह्यात आले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीन सभा घेतल्या. जागा वाटपापूर्वी शरद पवार यांनी मोदींना न्यायालयाने दोषी ठरवले नसल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. मात्र, आता त्याच मोदींवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.


नगरमध्ये राष्ट्रवादीचे राजळे व भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्यात प्रमुख लढत असली, तरी अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे व आम आदमी पक्षाच्या सोफिया (दीपाली) सय्यद यांनीही रंगत आणली आहे. राजळे यांच्या प्रचारासाठी पवार तीनदा जिल्ह्यात आले. सोमवारी त्यांची राहुरीत सभा झाली. तत्पूर्वी र्शीगोंदे, जामखेडमध्ये सभा झाल्या आहेत. जागावाटपापूर्वी काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी पवार यांनी मोदी यांना न्यायालयाने दोषी ठरवले नसल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली होती. मोदी व पवार यांची गुप्तभेट झाल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. एखाद्या मुख्यमंत्र्याला भेटण्यात काही गैर नसल्याचे सांगत पवार यांनी या वावड्यांना आणखी बळ दिले होते.


जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. सध्या मोदी यांच्यावरच त्यांचा रोख आहे. सोमवारी राहुरीत झालेल्या सभेतही त्यांनी मोदींवरच शरसंधान साधले. मोदी यांची शनिवारी (12 एप्रिल) नगरमध्ये सभा होत आहे. मोदी हे पवार यांच्या टीकेला काय उत्तर देतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहे.


बाळासाहेब विखे अजूनही प्रचारापासून दूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे अजून जाहीर प्रचारापासून दूर आहेत. शरद पवार यांच्या सभेकडेही त्यांनी पाठ फिरवली. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे मात्र या सभेला उपस्थित होते. शिर्डीतील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीत विखे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. मात्र, वाकचौरे यांच्या प्रचारातही ते जाहीरपणे अजून उतरले नाहीत. नगर मतदारसंघात त्यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा अजून सक्रिय झालेली नाही


यशवंतराव गडाख यांच्या भूमिकेकडेही लक्ष
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व बाळासाहेब विखे यांचे वितुष्ट जगजाहीर आहे. गडाख यांचे वर्चस्व असलेला नेवासे विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे काँग्रेसचे नव्हे, तर विखे यांचे उमेदवार असल्याचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे गडाख हे वाकचौरे यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सक्रिय होतात किंवा नाही यावरच विखेंची यंत्रणा नगर मतदारसंघात काम करेल की नाही, हे अवलंबून असल्याची चर्चा आहे.


दक्षिणेतील जिल्हा परिषद सदस्यांकडे अजून दुर्लक्षच
लोकसभा निवडणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्यांवर प्रचाराची भिस्त असते. राजीव राजळे यांच्या प्रचारात काँग्रेसचे जि. प. सदस्य अजून सक्रिय झालेले नाहीत. बाळासाहेब विखे यांनी आदेश दिल्यानंतरच हे सदस्य शेवटच्या काही दिवसांत सक्रिय होणार असल्याचे काँग्रेसच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.