आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Divya Marathi, Dilip Gandhi, Nagar

गांधीविरोधकांचे मोदींना साकडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली, तरी हे आरोप त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. आता तर विरोधी परिवर्तन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी गांधींच्या विरोधात थेट पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे. ‘भ्रष्टाचार हा देशद्रोह आहे, तर भ्रष्टाचार्‍यांचा (गांधी) पुरस्कार हा आपल्या देशभक्तीचा आविष्कार आहे काय?’ असा सवाल विरोधकांनी मोदींना दिलेल्या निवेदनात केला आहे. तथापि, हे निवेदन अजून मोदींपर्यंत पोहोचलेले नाही.


निवेदनावर तिसर्‍या आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. भालचंद्र कांगो, अँड. सुभाष लांडे, शिवराज्य पक्षाचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची नावे, तर परिवर्तन आघाडीचे संघटक अँड. सुधीर टोकेकर व राजेंद्र पवार यांच्या सह्या आहेत.


निवेदनात म्हटले आहे, देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी मोदी मते मागत आहेत. भ्रष्टाचाराला विटलेल्या लोकांचे मोदींकडे लक्ष लागले आहे. भाषणांत भ्रष्टाचाराचा तिरस्कार करणारे मोदी वास्तवात मात्र भाजपच्या भ्रष्ट उमेदवारांचा पुरस्कार करत आहेत. त्यामुळेच ते नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारात गुंतलेल्या गांधी यांच्या प्रचारासाठी आले. मोदी यांच्या म्हणण्यानुसार भ्रष्टाचार हा देशद्रोह आहे, मग भ्रष्टाचार्‍यांचा पुरस्कार हा आपल्या देशभक्तीचा आविष्कार आहे का, असा सवाल परिवर्तन आघाडीने केला आहे.


लोकशासन, भारतीय कम्युनिस्ट, शिवराज्य, समाजवादी, लाल निशाण, मार्क्‍सवादी, जनता दल आदी पक्ष एकत्र येऊन जिल्ह्यात जनजागृती करत आहेत. परंतु मोदी भ्रष्टाचार्‍यांवर गंगाजल शिंपडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या विचारशून्य राजकारणाचा परिवर्तन आघाडी निषेध करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
अर्बन बँकेच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली. मध्यमवर्गीय व कनिष्ठवर्गीयांना बँकेने मदतीचा हात दिला. फिरोदिया परिवार, झुंबरलाल सारडा व भाई बार्शीकर यांनी सचोटीने काम करून बँकेला प्रतिष्ठा व विश्वासार्हता मिळवून दिली. ही माणसे असताना एक पैशाचाही घोटाळा झाला नाही, परंतु खासदार गांधी सत्तेवर आल्यापासून बँकेचा अक्षरश: गुत्ता झाला आहे. त्यांनी बँकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून मारून खाण्याचा प्रयत्न केला.


भाजप नेत्यांकडूनही तक्रारी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार भाऊसाहेब फुंडकर, राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर आदींनी गांधी यांचा भ्रष्टाचार पक्षर्शेष्ठींना सांगितला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही बँकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र खासदार गांधी स्वत:चे राजकीय वजन वापरत बँकेतील गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिवर्तन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गुजरात पोलिसांचा अटकाव
प्रचारसभेसाठी नगरला आलेल्या नरेंद्र मोदी यांना गांधी यांच्या गैरव्यवहारांबाबतचे निवेदन देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी खूप प्रयत्न केले. स्थानिक पोलिसांनी त्यासाठी सहकार्य केले, परंतु गुजरात पोलिसांनी या पदाधिकार्‍यांना मोदींपर्यंत पोहोचू दिले नाही. असे असले तरी आम्ही इ-मेल व पोस्टाद्वारे मोदी यांच्यापर्यंत निवेदन पोहोचवणार आहोत.’’ बी. जी. कोळसे, उमेदवार

न्यायालयात जाणार
गांधी यांनी बेकायदेशीरपणे बँकेच्या जुन्या 80 हजार सभासदांचा मतदानाचा हक्क काढून घेतला. त्याविरोधात माजी अध्यक्ष अशोक कोठारी व मी न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बँकेची निवडणूक घेऊ नये, असे आदेश केंद्रीय निबंधकांनी दिले होते. परंतु गांधी यांनी राजकीय वजन वापरून र्मयादित सभासदांमध्ये बँकेची निवडणूक घेण्याचा डाव आखला आहे. केंद्रीय निबंधकांनीही निवडणूक घेण्यास परवानगी दिली. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगर अर्बन बँकेचे संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले.

गांधी यांच्यावरील आरोप
0गाईंच्या गोठय़ात सूतगिरणी दाखवून 14 कोटींचे कर्जवाटप केले.
0बँकेचे वैधानिक लेखा परीक्षण स्वत:च्या र्मजीप्रमाणे करून घेतले, त्यासाठी लेखा परीक्षकास बँकेकडून 11 लाखांचे बक्षीस
0भाजप नेत्याला खुश करण्यासाठी गुजरातमधील बंद पडलेल्या सुरत व अंकलेश्वर बँकेचे नगर अर्बन बँकेत विलीनीकरण केल्याने कोट्यवधींचा तोटा.
0खोटे कर्जदार उभे करून लाखो रुपयांचे कर्ज देण्यात आले. हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर कर्जदाराचा संशयास्पद मृत्यू
0बँकेच्या शाखा उभारणीस व कर्मचारी भरतीस सहकार खात्याची स्थगिती असतानाही भरती व शाखा उभारणी करण्यात आली.
0भाऊ व इतर र्मजीतील कर्जदारांना नियमित व्याजापेक्षा कमी व्याज आकारणी केली. त्यामुळे बँकेचे 3 कोटी 79 लाखांचे नुकसान
0बँकेच्या शाखा उद्घाटनांसाठी पाहुणे बोलावून त्यांच्या नावावर लाखो रुपयांचा खोटा खर्च दाखवण्यात आला.
0दोन्ही मुले व भावजयीने बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना दमबाजी करून स्वत:च्या खात्यात पैसे शिल्लक नसतानाही लाखो रुपयांचे धनादेश पास केले.