आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे हेच उद्दिष्ट; राष्ट्रीय अध्यक्ष विकास जैन यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- देशाचे नेतृत्व करण्यासाठी विकासाची दृष्टी, तसेच सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा सर्मथ पर्याय नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जनतेसमोर आला आहे. मोदींना पंतप्रधान बनवणे हेच ‘मोदी आर्मी’चे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास जैन यांनी रविवारी केले.

शेवगाव तालुका मोदी आर्मी संघटनेतर्फे येथे खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. जैन म्हणाले, महाराष्ट्राला विकास व नेतृत्वाची थोर परंपरा आहे. मात्र, राज्याचे नेतृत्व करणारे आजचे कार्यकर्ते हे जनतेच्या पाण्यासारख्या प्रश्नावर संतापजनक पर्याय सुचवून त्यांना अपमानित करतात. काँग्रेसने मोदींविषयी मुस्लीम बांधवांच्या मनात भीती निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. मात्र, भारतात या समुदायासाठी सुरक्षित वातावरण मोदींच्या नेतृत्वाखालील गुजरातमध्ये, तसेच भाजपशासित राज्यांतच असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोळगे यांनी केले. प्रदेश महासचिव बी. बी. सोमाणी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन, दिनेश लव्हाट, वाय. डी. कोल्हे, नय्युम शेख, बापूसाहेब चव्हाण आदींचीही भाषणे झाली. मेळाव्याला राधेश्याम तिवारी, अशोक निंबाळकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोळगे, विष्णूपंत देहाडराय, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शुभांगिनी ठाकूर, मीनाक्षी पोखरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना पांडोळे यांनी, तर आभार शहराध्यक्ष संतोष भुजबळ यांनी मानले.

मोदींसाठीच ‘आर्मी’
मोदी यांच्या रूपाने देशाला कणखर नेतृत्व मिळावे यासाठी आर्मीची स्थापना करण्यात आली आहे. देशातील नऊ राज्यांतील सुमारे अडीच लाख सदस्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिले आहे.

जनतेलाही विश्वास..
गुजरातमध्ये मिळालेल्या संधीतून समाजाला पुढे नेण्याचा विचार मोदी यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वाबाबत देशातील जनतेलाही विश्वास निर्माण झाला आहे.
-दिलीप गांधी, खासदार.