आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याने, क्रीडांगणासाठी नगरकरांचा आज एल्गार, भूखंड प्रस्तावांबाबत अधिका-यांना जाब विचारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहरातील उद्याने व क्रीडांगणांसाठी राखीव असलेल्या भूखंडांवर महापालिकेनेच हिरवाई विकसित करावी. तसेच, हे भूखंड इतर कारणांसाठी कोणालाही वाटू नयेत, या मागणीसाठी मंगळवारी मनपावर मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती अर्शद शेख यांनी दिली.
नगर शहरात विकासाचा मोठा अनुशेष आहे. ‘दिव्य मराठी’सातत्याने त्याबाबत आवाज उठवत आहे. दोन फेब्रुवारी रोजी दिव्य मराठी शहरातील उद्यानांच्या दुरवस्थेबाबत सविस्त वृत्तांत प्रसिद्ध केला होता. त्यानंतर शेख यांनी या विषयावर आवाज उठवण्याचे ठरवले. त्यांनी यासाठी शहर विकासासाठी सातत्याने आग्रही व सक्रिय भुमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून नगरच्या विकासासाठी जन आंदोलनाची स्थापना केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अशोक सब्बन त्यांच्या बरोबर आहेत. शेख यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात उद्याने व क्रीडांगणाच्या प्रश्नावरून करण्याचे ठरवले आहे. महापालिकेच्या बुधवारच्या सभेत मोकळे भूखंड वाटपाचे अनेक प्रस्ताव चर्चेसासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुळात नगरमध्ये मुलांना खेेळण्यासाठी जागा नाहीत. दोन महिन्यांनी शाळांना सुट्या लागतील. मुलांनी खेळण्यासाठी कोठे जायचे, असा शेख यांचा प्रश्न आहे. नगरमध्ये उद्याने व क्रीडांगणांची वानवा असताना असलेले भूखंड इतर कारणांंसाठी देऊ नयेत, अशी शेख यांची मागणी आहे. नगर शहरात एकमेव असलेल्या क्रीडा संकुलात प्रत्येक बाबीसाठी फी आहे. गरीब मुलांना ती अजिबात परवडणारी नाही. अर्थात ज्या सुविधा आहेत, त्याही अपु-या आहेत. गरीब मुलांशी खेळायचे नाही, असे काही मनपाने धोरण ठरवले आहे का, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी सकाळी ११ च्या दरम्यान नागरिकांचा मोर्चा महापालिकेवर नेण्यात येणार आहे. जोपर्यंत नागरिक महापालिकेवर दबाव टाकणार नाहीत, तोपर्यंत अधिकारी व पदाधिकाऱ्यांची मनमानी बंद होणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेख यांनी व्यक्त केला.
‘बीओटी’नको-
काही उद्याने विकसित करण्यासाठी खासगी संस्थाना ‘बीओटी’वर देण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे. उद्याने उभारणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे खासगीकरणातून ती विकसित करायचे कारण काय? उद्यानांसाठी नेमणूक असणारे कर्मचारी मनपाचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे घरगड्याचे काम करत आहेत. शासनाचा पगार व भत्ते घेऊन अशा प्रकारे मनपाचे कर्मचारी घरी राबवण्यांना घरी हाकलले पाहिजे. अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठीही उद्यानांचे कर्मचारी वर्ग करण्यात आले. अशी चुकीची धोरणे राबवली जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या सेवा खासगीकरणातून करायच्या असतील, तर महापालिकेची गरजच काय. ती बरखास्त करून सर्वच सेवांचे खासगीकरण करा. कर्मचाऱ्यांवर कोट्यवधींचा खर्च तरी वाचेल व नगरकरांना दर्जेदार सेवा मिळतील, असा सल्ला शेख यांनी दिला आहे.

करातून किती वृक्ष लावले?
नगरकरांकडून दरवर्षी महापालिका लाखो रुपयांचा वृक्षकर वसूल करते. त्यातून शहरात हिरवाई फुलणे अपेक्षित असते. मात्र, वर्षानुवर्षे या रकमेचे काय होते, हे नगरकरांना समजत नाही. नागरिकांनी स्वकष्टाने व स्वखर्चाने फुलवलेल्या उद्यानांतील झाडांना पाणी घालण्यासाठीही महापालिकेची माणसे जागेवर नसतात. मुळात दरवर्षीच्या बजेटमध्ये २० टक्के रकमेची तरतूद उद्यानांसाठी करायला हवी. ती होते का, होत असल्यास कोठे व किती उद्याने विकसित केली, याचा जाब आमचे आंदोलन संबंधितांना विचारणार असल्याची माहिती शेख यांनी दिली.

शाळांची मैदाने झाली खासगी
शहरातील अनेक शाळांना महापालिकेने मैदाने दिली आहेत. जेव्हा शाळा सुरू असते, तेव्हा सामान्यांना तेथे जाण्यास मज्जाव असणे समजू शकते. मात्र, शाळा संपल्यावर किंवा सुटीच्या दिवशी अनेक शाळा आपले मैदान खेळ किंवा नागरिकांना फिरण्यासाठी करण्यासाठी मनाई करतात. ही मैदाने त्यांच्या मालकीची आहेत का, हे मनपाने स्पष्ट करावे.'' अर्शद शेख, अध्यक्ष, मुकुंदनगर विकास कमिटी.