आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा डेपाेतील कामांसाठी पुन्हा प्रतीक्षाच, प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचे लवादाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बुरूडगावसावेडी उपनगरातील कचरा डेपोतील कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला आणखी दोन महिन्यांचा कालावधी हवा आहे. राष्ट्रीय हरित लवादासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीत तसे प्रतिज्ञापत्र महापालिका प्रशासनाने सादर केले. आतापर्यंत ५० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे दोन महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दरम्यान, कचरा डेपोतील कामे प्रदूषणाबाबत पाहणी करून २७ फेब्रुवारीला अहवाल सादर करा, असा आदेश लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. 

बुरूडगाव कचरा डेपोप्रश्नी मागील काही काळापासून लवादासमोर सुनावणी सुरू आहे. महापालिका प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने संतापलेल्या लवादाने सुनावणीसाठी उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनाच अटक करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी बजावले होते. त्यामुळे डोके ठिकाणावर आलेल्या प्रशासनाने १४ व्या वित्त आयोगातील सुमारे ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी कचरा डेपाेतील विविध विकासकामांसाठी वापरण्याचे नियोजन केले. स्थायी समितीने या कामांना मंजुरी दिली. 

या सर्व कामांचा लवादाने वेळोवेळी आढावा घेतला. मागील सुनावणीत निविदा प्रक्रिया राबवून कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती प्रशासनाने लवादासमोर केली होती. लवादाने कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली, परंतु अद्याप सर्व कामे पूर्ण झालेली नाहीत. सोमवारी झालेल्या सुनावणीस महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारून वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. बुरूडगाव सावेडी कचरा डेपोतील ५० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

याचिकाकर्त्यांचे वकील विनोद अंबड यांनी मात्र अद्याप २० ते ३० टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे कचरा डेपाे परिसरातील प्रदूषण कमी झाले नसून ते अधिक वाढले असल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून दिले. संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, हरित पट्टा, वीज यासारखी महत्त्वाची कामे अद्याप अपूर्णच असल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला डेपोतील कामे प्रदूषणाबाबत पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा लवादाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत डेपोतील सर्व कामे पूर्ण होणार का, याबाबत शंकाच आहे. 

दोन महिने प्रतीक्षा 
बुरूडगावकचरा डेपोमध्ये प्रतिदिन ५० टन क्षमता असलेला खत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सावेडी उपनगरातही प्रतिदिन शंभर टन क्षमतेचा खत प्रकल्प सुरू होणार आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रकल्प उभे राहिले, तरी ते पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाहीत. अंतर्गत रस्ते, मान्सून शेड, प्लॅटफॉर्म, संरक्षक भिंत अशी विविध कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 
 
दंडात्मक कारवाईची मागणी करणार 
महापालिकाप्रशासनाने पुन्हा एकदा लवादाची दिशाभूल केली. वकिलांमार्फत ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचे प्रतिज्ञापत्र प्रशासनाने सादर केले. प्रत्यक्षात डेपोतील केवळ २० ते ३० टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. प्रदूषण कमी होण्याऐवजी ते अधिक वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहणी करणार असून सत्य परिस्थिती लवादासमोर येणारच आहे. लवादाने महापालिका प्रशासनावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पुढील सुनावणीत करणार आहे.’’ राधाकिसनकुलट, याचिकाकर्ते. 
बातम्या आणखी आहेत...