आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचे स्मार्टकार्ड निरुपयोगी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांसाठी असलेली केंद्र सरकारची राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना गरिबांपर्यंत पोहोचतच नाही. या योजनेच्या स्मार्ट कार्डांचे नूतनीकरण डिसेंबर 2010 पासून झालेले नाही. ते केव्हा आणि कुठे होईल याची माहिती ना आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी सांगू शकते, ना कामगार कार्यालय.

पूरग्रस्तांसाठी हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटे फेकल्यावर ती ज्याच्या हाती लागली त्याची भूक मिटली, ज्याला मिळाली नाही तो उपाशी. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची जिल्ह्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. ज्याला माहिती मिळाली त्याला स्मार्ट कार्ड मिळाले. ज्याला माहिती मिळाली नाही ते यापासून वंचित राहिले. दारिद्रयरेषेखालील नागरिकांसाठी केंद्र शासनाने सन 2008 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेतंर्गत 30 हजारांपर्यंतचा खर्च शासनातर्फे दिला जातो. त्यासाठी प्रत्येक दारिद्रयरेषेखालील कुटुंबाला स्मार्ट कार्ड दिले जाते. या योजनेचे कार्ड बनवण्याचा ठेका आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला देण्यात आला आहे. कार्ड देण्यासाठी कंपनीचे एक कार्यालय पत्रकार चौकाजवळ आहे. सबजेल चौकातील सौभाग्य जनरल स्टोअर्स शेजारील शॉप नं. 14 मध्ये दुसरे कार्यालय आहे. डिसेंबरअखेर स्मार्ट कार्ड नूतनीकरण केल्याचा दावा कंपनी करते. मात्र, ग्रामीण भागात या योजनेची माहितीच नाही. ज्यांना कार्ड मिळाले त्यांना नूतनीकरण कोठे करायचे याची माहितीच नाही. नूतनीकरणाच्या वेळी दवंडी देऊन कंपनी ठिकाण व वेळ जाहीर करते. मात्र, ज्याला माहिती मिळत नाही ते स्मार्ट कार्डपासून वंचित राहत आहेत. नूतनीकरण आणि नव्याने स्मार्ट कार्ड मिळण्यापासून अनेक कुटुंबे वंचित आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2010 पासून नूतनीकरणाचे कामच झालेले नाही.
कोणतीही उपाययोजना नाही - स्मार्ट कार्ड योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारतर्फे कोणत्याही उपयायोजना राबवल्या जात नाहीत. जे स्मार्ट कार्डसाठी पात्र आहेत, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही. संपर्काची अत्याधुनिक माध्यमे असताना कंपनीकडून गावात दंवडी दिली जाते. दवंडी ऐकली तरच स्थळ आणि वेळ कळते.
रुग्णालयांची यादीच नाही - स्मार्ट कार्ड मिळाले, तरी उपचार कोणत्या रुग्णालयात घेता येतो, याची कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. कार्डसोबत रुग्णालयाची यादी देणे बंधनकारक आहे. मात्र, ठरावीक रुग्णालयांव्यतिरिक्त नागरिकांना इतर रुग्णालयांची माहिती नाही.
> नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचे लक्ष्य - 1 लाख 75 हजार 996
> स्मार्ट कार्डचे आतापर्यंत जिल्ह्यात वाटप - 98 हजार 301
> दवाखान्यांत स्मार्टकार्डचा उपयोग - 67
माझे नाव दारिद्रयरेषेखालील यादीत आहे. तसा दाखला आहे. माहिती घेण्यासाठी गेलो, तर आम्ही तुमच्या भागात येऊ, तपासणी करू असे सांगितले. मात्र, अद्याप कोणीच आले नाही. केव्हा येणार माहिती नाही.’’ संतोष गायकवाड, नगर
स्मार्ट कार्डाचे दर वर्षी नूतनीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, डिसेंबर 2010 पासून नूतनीकरणच झालेले नाही. कुठे नूतनीकरण करायचे याची माहिती दिली जात नाही.’’ अशोक चोभे, बाबुर्डी बेंद.
स्मार्ट कार्डविषयी अधिक माहिती देता येणार नाही. त्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधा. तेथे माहिती मिळेल. यावर्षीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.’’ राज शिंदे, प्रतिनिधी, लोम्बार्ड कंपनी
मी नुकताच पदभार घेतला आहे. स्मार्ट कार्डविषयी मला सांगता येणार नाही. जिल्हाधिकार्‍यांशी बोलतो अन् माहिती देतो.’’ बी. व्ही. वाघ, सहायक कामगार आयुक्त, नगर.