आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पेयजल अंतर्गत 205 पाणी योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 2013-2014 मध्ये 205 ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी दिली.

जिल्ह्यात दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींनी तळ गाठला होता. मोठे तलावही कोरडे पडले होते. अशा परिस्थितीत जिल्हाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ सहाशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली, तरी अजूनही काही तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा आणखी पंधरा दिवस असल्याने या कालावधीत शेतकर्‍याला दमदार पावसाची अपेक्षा आहे. गावपातळीवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो.

लंघे म्हणाले, या वर्षात 31 पाणी योजना प्रगतिपथावर असून नव्याने 174 योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी 56 योजनांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच 36 योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. सर्व योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता 15 नोव्हेंबरपर्यंत मिळेल. ज्या ग्रामपंचायतींना नळ पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा असेल, त्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव तालुकास्तरीय पाणीपुरवठा विभागाकडे पाठवावा. तालुकास्तरावरील उपअभियंत्यांकडून हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे लंघे यांनी सांगितले. तालुकानिहाय पाणी योजना : जामखेड 13, कर्जत 10, कोपरगाव 6, नगर 17, नेवासा 10, पारनेर 26, पाथर्डी 10, राहाता 9, राहुरी 16, संगमनेर 31, शेवगाव 5, श्रीगोंदे 18, तर श्रीरामपूर येथे 12 पाणी योजनांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम म्हणाले, नियोजित पाणी योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. सर्व कामे मार्च 2015 पर्यंत पूर्ण करायची आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. या योजनेच्या कामासंदर्भात वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.