आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Rural Employment Guarantee Scheme,Latest News In Divya Marathi

जिल्ह्यात तीन हजार सिंचन विहिरींची कामे अपूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2 हजार 972 सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असून यापोटी 46 कोटी 15 लाखांचे देणे बाकी आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत अवघ्या 133 विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत 2005 पासून सिंचन विहिरीची कामे करण्यासाठी सुमारे 1 लाख 90 हजार रुपये अनुदान दिले जाते. दुष्काळी परिस्थितीत अनेकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. पैकी जिल्हाभरातून आतापर्यंत 6 हजार 900 विहिरींच्या कामाला मंजुरी मिळाली. पैकी 3 हजार 37 विहिरींची कामे पूर्ण झाली असून त्यापोटी 57 कोटी 70 लाखांचे अनुदान प्रशासनाने अदा केले आहे. मार्च 2014 अखेर 3 हजार 78 कामे अपूर्ण होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्या माध्यमातून 133 विहिरींचे काम पूर्ण झाले.

लाभार्थ्यांनी विहिरींची कामे हाती घेतल्यानंतर कुशल व अकुशल मजुरांकडून ही कामे करायची आहेत. तथापि, कामे पूर्ण करताना वैयक्तिक अडचणींमुळे अनेक विहिरींची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. अनेक ठिकाणी कामे सुरू झाली, पण अर्ध्यावरच काम बंद पडले आहे. संबंधित लाभार्थ्याने दुर्लक्ष केल्याने ही कामे अपूर्ण राहिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
विहिरींच्या अपूर्ण कामांची तालुकानिहाय संख्या अशी : कोपरगाव 259, अकोले 299, जामखेड 377, कर्जत 498, नगर 80, नेवासे 145, पारनेर 292, पाथर्डी 347, राहाता 51, राहुरी 12, संगमनेर 118, शेवगाव 196, श्रीगोंदे 270, तर श्रीरामपूर तालुक्यात 78 विहिरींची कामे अपूर्ण आहेत.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत अपूर्ण विहिरींसह अनुदान वितरण बाकी असल्याचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी रखडलेले अनुदान तातडीने अदा करण्याच्या सूचना अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी दिल्या होत्या. तथापि, आतापर्यंत 3 हजार विहिरींची कामे अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामांची माहिती अद्ययावत करण्यासाठी नांदेड येथील सेतूत नोंद करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विहिरीचा लाभार्थी, कामाची सद्यस्थितीची माहिती भरण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत 2 हजार 643 अपूर्ण विहिरींची नोंद या सेतूत करण्यात आली आहे.

रोहयोंतर्गत विहिरी मंजुरीची घाई करून प्रस्ताव पाठवण्यात आले. तथापि, अनेक विहिरींच्या कामांना मंजुरी मिळूनही ही कामे सुरू होऊ शकली नाहीत. तसेच काही विहिरींचे दप्तरही उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितले.
वर्षभरात कामे पूर्ण करून अनुदान दिले जाईल
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरींची कामे परस्पर सुरू करण्यात आली. काही ठिकाणी कामे सुरू करून ती अर्ध्यावरच सोडण्यात आली. त्यामुळे ही कामे अपूर्ण राहिली आहेत. रखडलेले अनुदान अदा करण्यासाठी कुशल व अकुशल कामाचा प्रस्ताव नाशिकला पाठवला आहे. तेथून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी नागपूर येथे पाठवला जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर गटविकास अधिका-यांमार्फत अनुदान अदा केले जाईल. काम पूर्ण झाल्याशिवाय अनुदान देता येणार नाही. वर्षभरात रखडलेली कामे पूर्ण केली जातील. कामे पूर्ण झाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. अरविंद धारस्कर, गटविकास अधिकारी, रोजगार हमी योजना.