आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Rural Health Mission,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किशोरवयीन मुलांसाठी मैत्री क्लिनिक ठरतोय आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या किशोरवयीन अवस्थेत भेडसावणा-या विविध समस्यांवर समुपदेशनासाठी जिल्ह्यात पाच ठिकाणी मैत्री (अर्श) क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ही सविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्यावर्षी या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता.मावळणारे बालपण व खुणावणारे तारुण्य यांचा उंबरठा असलेल्या किशोरवयीन टप्प्यावर जीवनाला वेगळे वळण मिळते. शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, वैचारिक तसेच वर्तणुकीतील बदलाची 10 ते 19 वर्षे वयोगटातील अवस्था मुला-मुलींच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची असते. या वयात पडणारे प्रश्न, भेडसावणा-या समस्या यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून मिळणारी उत्तरे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवू शकतात. याच उद्देशाने केंद्र सरकारच्या राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत प्रजनन व बाल आरोग्य टप्पा दोन अंतर्गत मैत्री क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, तसेच भावनिक बदल घडतात. या बदलांना सामोरे जाताना ते काहीसे बावरून जातात. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यात असते. ही उत्सुकता चांगल्या मार्गाने व शास्त्रीय पद्धतीने शमवण्याचा प्रयत्न मैत्री क्लिनिकमध्ये केला जातो. या क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. किशोरवयीन वयातील शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आरोग्य, आहार, विवाहपूर्व मार्गदर्शन, कुटुंब नियोजन साधने याबाबत माहिती व समुपदेशन करण्यात येते. तसेच वैद्यकीय तपासणी व उपचाराची सुविधाही पुरवण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्लिनिकमध्ये येणा-या किशोरवयीन मुला-मुलींची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येते.
जिल्हा रुग्णालयात दररोज सकाळी साडेनऊ ते साडेबारा, पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात साडेदहा ते साडेबारा, कर्जतचे उपजिल्हा रुग्णालय संगमनेरचे ग्रामीण रुग्णालय येथे साडेनऊ ते साडेबारा, कोपरगाव येथे नऊ ते बारा व पाथर्डी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर मंगळवारी साडेनऊ ते साडेबारा या कालावधीत मैत्री क्लिनिक सुरू राहणार आहे.

रक्तक्षय प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप
अर्श कार्यक्रमांतर्गत डब्ल्यूआयएफएस उपक्रमात 10 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना शाळेमार्फत रक्तक्षय प्रतिबंधक गोळ्या वाटप करण्यात येईल. दर सोमवारी या गोळ्यांचे शाळांमध्येच वाटप करण्यात येईल. शाळाबाह्य मुला-मुलींना दर सोमवारी अंगणवाडीमार्फत या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी साडेआठ हजारजणांना लाभ
या उपक्रमांतर्गत सन 2013-14 या वर्षात साडेआठ हजार किशोरवयीन मुला-मुलींनी या सुविधेचा लाभ घेतला. गेल्या वर्षभरात विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये 80 बाह्यसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शन शिबिर, विविध स्पर्धा व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीही विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.