Home »Maharashtra »Western Maharashtra »Ahmednagar» National Ticket Collection Exhibition In Mumbai

राष्ट्रीय ‘इन्फेक्स’ प्रदर्शनात जामखेडच्या हळपावत यांचा संग्रह

प्रतिनिधी | Feb 22, 2013, 12:51 PM IST

  • राष्ट्रीय ‘इन्फेक्स’ प्रदर्शनात जामखेडच्या हळपावत यांचा संग्रह

जामखेड - टपाल तिकिटांचे राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन ‘इन्फेक्स 2013’ गुरुवारपासून मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू झाले. या प्रदर्शनासाठी जामखेड येथील पोपटलाल हळपावत यांच्या संग्रहाची निवड झाली आहे. त्यांच्या रूपाने नगर जिल्ह्याला प्रथमच राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.

फिलॅटेली सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थापनेला 115 वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेला यजमानपदाचा मान देऊन भारतीय टपाल खात्यामार्फत पाच दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या प्रदर्शनात देशभरातील 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्यपदक देऊन गौरवण्यात येणार आहे. विजयी ठरणार्‍या संग्रहांना जागतिक टपाल तिकीट प्रदर्शनात सहभागी होण्याचा मान मिळेल.

हळपावत यांनी ‘भारतीय शिरोवस्त्रे’ हा विषय तिकिटांच्या माध्यमातून मांडला आहे. भारतीय शिरोवस्त्रांना अतिशय जुनी परंपरा असून ऊन, वारा, पाऊस आणि हल्ल्यांपासून बचाव करणे असा त्यांचा उद्देश आहे. शिरोवस्त्र हा केवळ पोषाखाचा भाग नसून त्या त्या व्यक्तीचे समाजातील स्थान दर्शवण्याशी त्याचा संबंध आहे. अनेक वर्षांपूर्वी शिरोवस्त्रांसाठी उष्णीव हा वापरला जात असे. मात्र, कालांतराने देशातील विविध भागांत टोप्या, फेटा, पागोटे, पगडी आदी नावांची मान्यता प्राप्त झालेली शिरोवस्त्रे वापरण्याचा प्रघात पडला. पूर्वी स्त्रियाही पगड्या वापरीत असत. सध्याच्या यांत्रिक आणि फॅशनच्या युगातही शिरोवस्त्रांचे महत्व अबाधित आहे. प्रत्येक प्रांतातील जाती-धर्माची विविध प्रकारची शिरोवस्त्रे असून त्यातून इतिहास व संस्कृतीचे दर्शन घडते. शिरोवस्त्रांचा हाच इतिहास हळपावत यांनी टपाल तिकिटांच्या माध्यमातून मांडला आहे.

हळपावत यांना यापूर्वी ‘नगरपेक्स 2002’ आणि ‘पुणे महापेक्स 2012’ या राज्यस्तरीय प्रदर्शनात रौप्यपदक मिळाले आहे.

राष्ट्रीय प्रदर्शनात जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांनी देश-विदेशातील टपाल तिकिटांचा संग्रह प्रदर्शित केला आहे. या तिकिटांतून त्या त्या देशांची संस्कृती व इतिहास स्पष्ट होतो.

राष्ट्रीय पातळीवर संधी हाच बहुमान
‘इन्फेक्स 2013’ स्पध्रेत देशभरातील स्पर्धकांशी माझ्या संग्रहाची तुलना होणार आहे. मात्र, मी यशापयशाचा विचार करत नाही. राष्ट्रीय पातळीवरील स्पध्रेत सहभागी होण्याची संधी मिळणे हाच बहुमान आहे. पोपटलाल हळपावत, टपाल तिकीट संग्राहक.

Next Article

Recommended