आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - राष्ट्रवादीची अंतर्गत धुसफूस विकोपाला जाऊन दोन दिवसांपूर्वी पदाधिकार्यांसह सातशे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला बसलेला हा मोठा धक्का आहे. या प्रकरणाची पक्षातील ज्येष्ठ मंडळींनी धास्ती घेतली असून प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच होणार्या बैठकीत यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजले.
राष्ट्रवादीत सुरू असलेली गटबाजी पक्षर्शेष्ठींसाठी डोकेदुखी बनली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, तनपुरे यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले.
सुरुवातीला धुसफूस केवळ राहुरी तालुक्यातच होती. नंतर हे लोण पारनेरपर्यंत पोहोचले. शिवसेनेच्या आमदारांची कामे होतात, मात्र पक्षातील कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशी खंत तेथे व्यक्त करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे परवडणार नसल्याने वरिष्ठ नेत्यांनी दुखावलेल्या कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्ष पिचड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
एकत्र बैठक घेणार
कार्यकर्त्यांचे राजीनामे मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी चर्चा झाली आहे. यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल.’’ घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष.
जिल्हाध्यक्षांबाबतही नाराजी
छावण्यांबाबत प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. सहनशीलतेचा अंत होऊन टोकाची भूमिका घ्यावी लागली. आमची पालकमंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्याबाबतही नाराजी आहे.’’ सुजित झावरे, सदस्य, जिल्हा परिषद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.