आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून पोलिसाला मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पोलिसास बेदम मारहाण केली. ही घटना नगर जिल्ह्यातील लोणी व्यंकनाथ येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनंतर गावातील दोन्ही प्रतिस्पर्धी गट परस्परांना भिडले. अतिरिक्त फौजफाटा आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस कर्मचारी शाहबाज शेख यांच्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दादा बाळू खामकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र तो फरार झाला.


चार दिवसांपूर्वीच धुळे येथे राष्‍ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रांनी पोलिस अधिका-यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यापाठोपाठ ही दुसरी घटना घडली. लोणी व्यंकनाथ येथे शुक्रवारी मतदान सुरू होते. श्रीगोंदे बाजार समितीचे सभापती व काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाहाटा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणपतराव काकडे यांच्या पॅनलमध्ये चुरस होती. दुपारी बारा वाजता दादा बाळू खामकर हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता समर्थकांसमवेत मतदानासाठी आला. तो रांगेत घुसत असताना पोलिस कर्मचारी शेख याने त्यास अडवले. त्याचा राग आल्याने खामकर याने शेख यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच खाली पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले. याबाबत नाहटा यांनी खामकरला जाब विचारला, त्यामुळे दोन्ही गटात बाचाबाची झाली. विशेष म्हणजे मारहाण होत असताना सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड जवळच होते. मात्र त्यांनी हस्तक्षेप न करता केवळ ‘जाऊ द्या, मारू नका,’ एवढेच खामकरला सांगितले. या घटनेचे चित्रीकरण काहींनी केले आहे.