आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणची कसरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मागील काही दिवसांत झालेल्या वादळामुळे महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान झाले. खांब पडून तारा तुटल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत सुरू आहे. वादळाच्या तडाख्यामुळे महावितरण हैराण झाले असून जनतेच्या रोषालाही कर्मचारी व अधिकार्‍यांना सामोरे जावे लागत आहे.
वादळी पावसामुळे महावितरणचे नियोजन कोलमडून गेले आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात शेकडो खांब कोसळले. अनेक ठिकाणच्या तारा तुटल्या. डीपी जळाल्या. त्यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटामुळे वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड होतो. रात्री पावसात दुरुस्ती करताना अडचणी येतात. सध्या उकाडा वाढल्याने रात्री वीज गेली की नागरिक वैतागतात. महावितरणविषयी संताप वाढत चालला आहे.

नागरिकांचा रोष टाळण्यासाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. एखाद्या ठिकाणचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण लाइनचे पेट्रोलिंग करावे लागते. त्यासाठी पाच-सहा तास लागतात. फॉल्ट सापडल्यानंतर दुरुस्ती करण्यात वेळ जातो. वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत होतोही, पण पुन्हा दुसर्‍या दिवशी वादळी पाऊस झाला की, पुन्हा वीजपुरवठा खंडित होतो. या दुष्टचक्रामुळे महावितरणचे कर्मचारी हैराण झाले आहेत. त्यांना सध्या रात्रंदिवस काम करावे लागत आहे.

वीजपुरवठा खंडित झाला की, नागरिक महावितरणच्या तक्रार केंद्रात फोन लावतात. बर्‍याचदा या केंद्रात पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसतात. इतर कर्मचार्‍यांवर या केंद्राचा अतिरिक्त भार असतो.