आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल महागल्याने गॅसकीटला मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारकांचा कल चारचाकी वाहनांना गॅसकीट बसवून घेण्याकडे वाढत आहे. गॅसकीट बसवणार्‍या दुकानांमध्ये दररोज 3 ते 4 वाहनांना हे कीट बसवले जाते. गॅसकीटच्या माध्यमातून शहरात दरवर्षी 2 कोटींची उलाढाल होते.

गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ झाली. मागील चार वर्षांपासून पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडत आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून चारचाकी वाहनधारक गॅसकीटचा पर्याय स्वीकारू लागले आहेत.

पेट्रोलचा भाव सध्या 75 रुपये लिटर आहे. एका लिटरमध्ये गाडी 18 ते 22 किलोमीटर जाते. गॅसच्या टाकीत 300 किलोमीटर गाडी चालते. गॅसच्या अनुदानित टाकीची किमत 480 रुपये आहे. काळ्याबाजारात ही टाकी 800 रुपयांना मिळते. पेट्रोलच्या तुलनेत गॅसवर वाहन चालवणे स्वस्त पडते.

चारचाकी वाहनांना एलपीजी गॅसकीट बसवले जाते. परवानाधारक गॅसकीट बसवणारी 5 दुकाने शहरात असून अनधिकृत दुकानांची संख्या 50 हून अधिक आहे. गॅसकीट बसवण्यासाठी 10 ते 45 हजारांपर्यंत खर्च येतो.

मिजो ऑटो गॅस, लो व्हॅटो, तारतारिणी, बीआरसी व ओएमव्हीएल या कंपन्यांचे गॅसकीट बाजारात उपलब्ध आहेत. मिजो ऑटो गॅसकीटला सर्वाधिक मागणी आहे. या कीटची किमत 17 ते 22 हजारांपर्यंत आहे.

अधिकृत गॅसकीट दुकानांमध्ये दररोज 3 ते 4 वाहनांना कीट बसवले जाते. महिनाभरात 90 हून अधिक वाहनांना गॅसकीट बसवले जाते. महिन्याकाठी 15 लाख 30 हजारांची, तर वर्षभरात सुमारे 2 कोटींची उलाढाल होते. वाहनात गॅस भरण्यासाठी एक पंप आहे. 50 रुपये लिटरने गॅस मिळतो. एका लिटरमध्ये वाहन 18 किलोमीटर जाते. टाकी भरली की वाहन 300 किलोमीटर धावते. पेट्रोलच्या तुलनेत एक लिटर गॅसमागे 27 रुपये वाचतात.

घरगुती गॅस वाहनासाठी वापरल्यास कारावास
घरगुती गॅसचा वापर वाहनासाठी करताना आढळल्यास पुरवठा विभाग गुन्हे दाखल करतो. हा गुन्हा सिध्द झाल्यास एक वर्ष कारावास व दंड होतो. घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी पुरवठा विभागाबरोबरच वाहतूक पोलिस व आरटीओची आहे. घरगुती गॅसटाकीचा वाहनासाठी वापर केल्यास कारवाईचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी मंगळवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.