आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा देवीच्या मूर्ती 15 टक्के महागल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सार्वनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना आता वेध लागले आहेत नवरात्रोत्सवाचे! या उत्सवासाठी मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यासाठी कारागीरांची लगबग सुरु आहे. नगरमधील कलाकारांनी तयार केलेल्या देवीच्या मूर्ती राज्यभर जाणार आहेत. महागाईमुळे यंदा मूर्तींच्या किंमतीमध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे.

नगर व श्रीरामपूर शहरात नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव संपताच सार्वजनिक मंडळे नवरात्रोत्सवाच्या नियोजनाला लागली आहेत. काही मंडळांनी अगोदरच कामाला सुरुवात केल्यामुळे त्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. काही कुंभार देवीच्या मूर्ती तयार करतात. नगर शहरातील कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात राहणारे काही व्यावसायिक मोठय़ा प्रमाणावर देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करतात. शिवाजीनगर परिसरातील कारखान्यांमध्ये 3 फुटांपासून 15 ते 20 फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांच्या रंगरंगोटीचे काम सुरु आहे. या मूर्ती लवकरच राज्याच्या विविध भागात रवाना होतील.

यंदा डिझेलचे वाढलेले भाव व मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल यामध्ये दरवाढ झाल्यामुळे मूूर्तीचे भावही 15 टक्क्यांनी वाढले आहेत.

नवरात्रात शहरात अनेक ठिकाणी रास गरबा व दांडिया खेळला जातो. दांडियाच्या किंमती 15 रुपयांपासून पुढे आहेत. काही दांडिया हलक्या घुंगरांनी सजलेल्या आहेत. रास-गरबा खेळायला लागणारा पारंपरिक पोषाख काही दुकानांत भाड्याने दिला जातो. उत्सवाला अद्याप आठवडाभर अवकाश असला, तरी दांडियाचे नियोजन केव्हाच सुरु झाले आहे. शहरातील महिला मंडळ व युवक कार्यकर्त्यांनी मंडपाची उभारणी, सजावट, ढोल-ताशांची बुकिंग व रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. 5 ऑक्टोबरला घटस्थापना होईल.

रथावर स्वार दुर्गेचे आकर्षण
वाघ व रथावर स्वार झालेल्या दुर्गामातेच्या मूर्ती यंदा विशेष आकर्षण ठरल्या आहेत. अडीच ते साडेसहा फूट उंच आकाराच्या या मूर्ती औरंगाबाद, तसेच मराठवाड्यातील इतर जिल्हे, पुणे, मुंबई, नाशिक येथे जाणार आहेत. यंदा मोठय़ा आकारापेक्षा मध्यम आकाराच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. कमीत कमी 2 हजारांपासून 5 हजारांपर्यंत मूर्तीच्या किमती आहेत. मोठय़ा मूर्तीसाठी खर्च करण्यापेक्षा नवरात्रोत्सवात इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर मंडळांचा अधिक भर आहे.

भारनियमनाचा फटका
गणेशोत्सवात भारनियमन रद्द करण्याचा निर्णय झाला होता. आता पुन्हा भारनियमन सुरू झाले आहे. त्याचा फटका मूर्ती तयार करणार्‍या कारखान्यांना बसत आहे. अवघ्या 5-6 दिवसांत काम संपवावे लागणार आहे. भारनियमनाच्या समस्येमुळे मूर्ती तयार करणार्‍या कारखान्यांतील कामगारांना रात्रभर जागून रंगरंगोटी करावी लागत आहे. आणखी काही काळ भारनियमन शिथिल करण्याची कारखानदारांची मागणी आहे.’’ नंदकिशोर रोकडे, मूर्तीकार