आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर घुमतोय स्त्री शक्तीचा जागर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांवरील अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत तिची होणारी घुसमट यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाचा फोडली जात आहे.
स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियावर झळकत आहेत. काही प्रमाणात का होईना, स्त्रीच्या समस्यांची सोशल मीडियाद्वारे दखल घेतली जातेय, हेही काही कमी नाही. सोशल मीडियाचा हा चांगला परिणाम मानला जातोय.
सण, ‘विविध डे’जचे इव्हेंटमध्ये होणारे रूपांतर पाहून सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा नेटिझन्सचा ट्रेंडही बदलला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरा जरी खट्ट वाजले, तरी त्याचे पडसाद सर्वांत आधी सोशल मीडियावर उमटतात. ते कधी समाजातील विविध पैलू प्रवृत्तींचे चांगले, तर कधी विकृतीचेदेखील दर्शन घडवतात.

नवरात्रीचा जागर म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. दुर्गा, महालक्ष्मी, महिषासूर मर्दिनीचे भक्त धूप-धुपारे करून प्रसन्न करून घेण्यासाठी धडपड करत आहेत, तर काही जण देवीच्या खऱ्या म्हणजे स्त्रीत्वाच्या महिमा जागृतीचा विडा उचलून सुजाण नागरिकांचे कर्तव्य पार पाडत आहेत. "काही लाखांसाठी सुनेला जिवंत जाळणारे आज स्त्री शक्तिरूपात देवीला पूजणार....पोटात मुली मारणारे सुशिक्षित लोक जगदंबेची स्थापना करणार...नवरा म्हणून बायकोला गुलामासारखे वागवणारे रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार... आई, तुझ्या नावाने घटस्थापना होणार...' अशा प्रकारचे स्त्री जागरूकतेचे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. एक रंग स्त्रीभ्रूण थांबवायचा... दुसरा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा... असाही एक मेसेज जोरदारपणे समाजाच्या विवेकाला आवाहन करत आहे. त्याचबरोबर अॅसिड हल्ल्याला बळी पडलेली रूपा आज ‘रूपा’ फॅशन डिझायनिंग हाऊसने ओळखली जाऊ लागली आहे.

रेल्वेमध्ये चोरांच्या हल्ल्यांत पाय गमावलेली अरुणिमा सिन्हा पहिली महिला माउंट एव्हरेस्टवीर ठरली. अशा प्रकारच्या महिलांना प्रेरणा देणाऱ्या छायाचित्रांच्या पोस्टही सध्या व्हॉटस अॅपवर आहेत. सोशल मीडियावर स्त्रीशक्तीला काही प्रमाणात का होईना आदर मिळतो आहे, पण खऱ्या आयुष्यात त्या प्रत्यक्षात येण्याची प्रतीक्षा महिलांना करावी लागत आहे.

प्रत्येक सणाला स्त्रीच्या अस्तित्वाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तिच्या अनेक रूपांचे दर्शन सणांच्या निमित्ताने घडते. रक्षाबंधनाला बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याला धाग्याने घट्टपणे बांधणारी बहिणीच्या रूपातील स्त्री.... वटपौर्णिमेला पतीच्या उदंड आयुष्यासाठी पूजा करणारी पत्नी....कुटुंबासोबत निसर्गालादेखील स्वत:मध्ये सामील करत नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करणारी स्त्री..., तर नवरात्रीच्या वेळी ती देवीच्या रूपात असते.

देवीच्या जागराच्यावेळी हातात तेवती ज्योत घेऊन पळणारे पुरुषी हात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मात्र अपवादानेच पेटून उठतात. आदिशक्तीचे रूप माननाऱ्या देवीसमोर दांडिया खेळताना विचकटपणे स्त्रीला स्पर्श करणाऱ्या पुरुषी देहाला देवी खरेच पावेल की कोपेल...? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. ज्या दिवशी सोशल मीडियावर झळकणारे स्त्री शक्तीच्या जागृतीचे मेसेज खऱ्या आयुष्यातदेखील अंमलात येऊन अॅसिड हल्ले, छेडछाडी, अत्याचार, बलात्कार थांबतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने नवरात्रीच्या जागराला अर्थपूर्णता येईल...

विचारांचा प्रत्यक्ष अंमल हवा...
सहनशीलताहा जसा स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव आहे, तसेच इर्षादेखील स्त्रीचा नैसर्गिक दोष आहे. तो दोष त्यांनी स्वत:च दुरुस्त करायला पाहिजे. अनेक वेळा स्त्रीच स्त्रीचा दुश्मन ठरते. आजूनही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला कमी प्रतिष्ठा मिळते. किती अभ्यासपूर्ण, बौद्धिक विचाराने गोष्टी मांडल्या, तरी त्याची लवकर दखल घेतली जात नाही. सोशल मीडियावर स्त्री शक्तीचे मेसेज प्रेरणा देणारे असले, तरी तशी विचारसरणी अंमलात आणणे गरजेचे आहे.'' डॉ.संध्या जाधव, प्राणीशास्त्र विभाग, न्यू आर्टस कॉलेज.
बातम्या आणखी आहेत...