आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून पोलिसाला बेदम मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान शुक्रवारी दुपारी बंदोबस्तावरील पोलिसास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर गावातील दोन्ही प्रतिस्पर्धी गट परस्परांना भिडले. अतिरिक्त फौजफाटा आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस कर्मचारी शाहबाज शेख यांच्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दादा बाळू खामकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी खामकर फरार झाला आहे.

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान सुरू होते. र्शीगोंदे बाजार समितीचे सभापती व काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाहाटा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपसभापती गणपतराव काकडे यांच्या सर्मथकांच्या पॅनेलमध्ये पंधरा जागांसाठी जोरदार चुरस होती. गावातील मतदान केंद्रावर दुपारी बारा वाजता दादा बाळू खामकर हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आपल्या सर्मथकांसमवेत मतदानासाठी आला. रांग तोडून तो आत शिरत असताना ड्युटीवरील पोलिस शहाबाज शेख याने त्यास अडवले. ‘‘रांगेत उभे राहून मतदान करा’’, असे पोलिसाने सांगितल्याचा राग अनावर होऊन खामकर याने शेख यांच्या र्शीमुखात भडकावली. नंतर पोटात गुद्दे लगावले. एवढय़ावर तो थांबला नाही, तर पोलिसास खाली पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले.

या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत होऊन पळू लागले. या दरम्यान नाहाटा पोहोचले. त्यांनी पोलिसास मारहाण करणार्‍याला जाब विचारला असता राष्ट्रवादीच्या सर्मथकांनी अर्वाच्च भाषा वापरली त्यावरून पुन्हा दोन्ही गटांत धुमश्चक्री झाली. पोलिस निरीक्षक अजय जाधवराव हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिक कुमक मागवून जमाव पांगवण्यात आला. या दरम्यान खामकर पळून गेला. नंतर तणावपूर्ण वातावरणात मतदान सुरू झाले.

जाऊ द्या, मारू नका..
पोलिस कर्मचारी शेख यांना खामकर मारहाण करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड जवळच उभे होते. शेख हे गायकवाड यांच्याकडे मदतीची याचना करीत होते. तथापि गायकवाड यांनी ‘‘जाऊ द्या, मारू नका,’’ एवढेच खामकरला म्हणत होते. या घटनेचे चित्रीकरण व ध्वनिमुद्रण काहींनी केले आहे. पोलिसास मारहाण होत असताना अधिकार्‍याने घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेचा सभापती नाहाटा यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.