आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp congress Power In Nagar Munciple Corporation

\'मन\'से मदतीमुळे नगरमध्ये राष्ट्रवादीचा महापौर, काँग्रेसकडे उपमहापौरपद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - महापालिकेत सत्ता कोण स्थापन करणार? यावर आज दुपारी शिक्कामोर्तब झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे व अपक्षांच्या मदतीने महापौरपद पटकावले आहे. तसेच उपमहापौर काँग्रेसकडे गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांची महापौरपदी तर काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांनी उपमहापौरपदी बाजी मारली आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली होती. आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने केला होता त्यामुळे त्यांनी सत्ता मिळविण्यात यश मिळवले. मात्र, ऐनवेळी काहीतरी चमत्कार होईल व पुन्हा युतीची सत्ता येईल, अशी आशा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना वाटत होती. मात्र मनसेने हा चमत्कार टाळल्याची चर्चा आहे.
महापालिका निवडणुकीत नगरकरांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नव्हते. त्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार? तसेच महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, महापालिकेत आघाडीच सत्ता स्थापन करणार हे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादीने महापौरपदासाठी संग्राम जगताप यांचे, तर काँग्रेसने उपमहापौरपदासाठी सुवर्णा कोतकर यांचे नाव जाहीर केले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणार्‍या संख्याबळाची जुळवाजुळव पूर्ण झाल्याचा दावाही आघाडीने केला होता.
दरम्यान, युतीनेही सत्ता स्थापन करण्याची आशा शेवटपर्यंत सोडलेली नव्हती. त्यामुळेच शिवसेनेचे अनिल शिंदे व भाजपचे बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला होता. ऐनवेळी काही गडबड होऊ नये, यासाठी वाकळे यांनी उपमहापौरपदासाठीही अर्ज भरला होता. शिवसेनेच्या दीपाली बारस्कर यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज भरला होता. मात्र जगताप आणि कोतकर यांनी युतीच्या उमेदवारांचा पराभव केला.
नगर महापालिकेत राष्ट्रवादीला सर्वांधिक 18, त्याखालोखाल शिवसेनेला 17, काँग्रेसला 11, भाजपला 9, मनसे 4 आणि अपक्षांना 9 जागा मिळाल्या आहेत. यात मनसे (4) आणि अपक्ष (8) यांच्या मदतीने राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने सत्ता काबिज केली.