आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकारी निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंदार जगताप व तालुकाध्यक्षपदी भूषण थोरात यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. आठच दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षपदी सौरभ देशमुख यांची व शहराध्यक्षपदी करण शिरसाठ यांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे नव्याने झालेल्या निवडीवरून संगमनेरमध्ये रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत.

नव्याने निवड झालेल्या पदाधिकार्‍यांची नावे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडून कळवण्यात आली. दरम्यान, या निवडीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जुन्या पदाधिकार्‍यांनी हरकत घेत या निवडी मान्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नव्याने निवडलेल्या पदाधिकार्‍यांचा पक्षाशी कोणताही संबंध अथवा योगदान नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे संघर्ष सुरू असताना आता पुनरावृत्ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्येही झाली आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी 2007 पासून झालेल्या नव्हत्या. मात्र, तीन वर्षांपासून विद्यार्थी काँग्रेसमधील मरगळ कमी होऊन राष्ट्रीय महासचिव अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काम सुरू झाले.

खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात विविध उपक्रमही राबवले गेले. शहराध्यक्षपदी शिरसाठ यांची व प्रभारी तालुकाध्यक्षपदी नीलेश गायकर यांची निवड करण्यात आली होती. गेल्या महिन्यात पुन्हा शहर व तालुकाध्यक्षपदाच्या निवडी नव्याने करण्यात आल्या. तालुकाध्यक्षपदी देशमुख यांची निवड जाहीर करण्यात आली, तर शिरसाठ यांना शहराध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले.

नव्याने निवडलेल्या पदाधिकार्‍यांनी कामे देखील सुरू केली. मात्र, तालुकाध्यक्षपदी देशमुख यांच्याऐवजी थोरात यांची, तर जिल्हा उपाध्यक्षपदी मंदार जगताप याची निवड करण्यात आल्याचे पत्र मंगळवारी तब्बल आठवडाभराने माध्यमाकडे पाठवण्यात आले.

आठ दिवसांत झालेल्या या पदाधिकार्‍यांच्या निवडीच्या नाट्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष समोर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वस्तुस्थितीची जाणीव पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना करून देण्यात येणार असल्याची माहिती शिरसाठ, देशमुख, गायकर, जावेद शेख यांनी दिली. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीच्या राजकारणावरून नाराजांबरोबर आता पक्षातील विद्यार्थी काँग्रेसच्या संघटनेतील संघर्ष वाढणार असल्याचे दिसून येत आहे.