आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावरून राडा; दातेंना डावलून जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पारनेर तालुक्यातील काशिनाथ दाते यांची तातडीने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पण चोवीस तासांच्या आत ही निवड रद्द करून जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या दाते समर्थकांनी सुजित झावरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पक्षातील दोन गटांमध्ये यावरून जोरदार हमरीतुमरी झाली.

शेलार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तातडीने पारनेरच्या बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सायंकाळी पारनेर तालुक्यातील दाते विरोधी गटाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाते यांची निवड रद्द करण्याची मागणी केली. याला सुजित झावरे यांचाही पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले. निष्ठावंतांना या पदावर संधी देण्याची मागणी त्यांनी श्रेष्ठींकडे लावून धरली. त्यामुळे पक्षाने दाते यांची निवड रद्द करून सोमवारी अभंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अभंग यांची निवड केल्याचे जाहीर केले. या पदासाठी रावसाहेब म्हस्के, राजेंद्र फाळके, रावसाहेब म्हस्के, दादा कळमकर आदी नावे चर्चेत होती. मात्र, निर्णय झाला नव्हता. काकडे यांनी अभंग यांच्या नावाची घोषणा करताच दाते समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला. नंतर समर्थकांनी कार्यालयाबाहेर येऊन झावरे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. झावरे यांनी घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांना ‘ओरडता का ?’ असा सवाल केला. समोर येऊन शिव्या द्या. तुम्हाला काय म्हणायचे ते इतरांबद्दल म्हणा. मी कोणाचंही घोडं मारलं नाही, असे ते म्हणाले. त्यावेळी दोन गटांत चांगलीच हमरीतुमरी होऊन गोंधळ झाला.
घनश्याम शेलार, तेव्हा कुठे गेला होता तुमचा स्वाभिमान ?
लोकसभेत मित्रपक्षांपेक्षा आम्हाला निश्चितच जास्त जागा मिळाल्या, पण यात समाधान मानू नये. आगामी विधानसभाही दोन्ही काँग्रेस एकत्र लढण्याच्या प्रयत्नांत आहेत. घनश्याम शेलार यांना अनेक पदे दिली. पण पक्ष अडचणीत असताना तुम्ही पाठ दाखवत असाल, तर तुमचा स्वाभिमान कुठे गेला? तुमचे समाधान झाले नव्हते, तर तुम्ही अगोदर का पक्षाबाहेर गेला नाही? असा सवाल पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी बैठकीत केला.
छायाचित्र - राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काशिनाथ दाते समर्थकांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळ झाला.