आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल: राष्ट्रवादीचे नाव वापरून स्वस्त घरांचे आमिष!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा व चिन्हाचा गैरवापर करून राष्‍ट्रवादी जनरल कामगार युनियनने पाच जिल्ह्यांतील कामगारांना स्वस्त घराचे स्वप्न दाखवले आहे. सभासद शुल्क म्हणून चारशे रुपये आणि नियोजित निवारा प्रकल्पासाठी साडेअकरा हजार रुपये गोळा करण्याची मोहीम सध्या शहरात सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचाच हा प्रकल्प असल्याची दिशाभूल करणारी माहिती लोकांना दिली जात आहे. सुमारे दीडशे ते दोनशेजणांनी आतापर्यंत या योजनेचे सभासदत्व स्वीकारले असून फसवणुकीच्या शक्यतेने संबंधित हवालदिल झाले आहेत.
नगरसह ठाणे, रायगड, नाशिक व औरंगाबाद या पाच शहरांजवळ पाच हजार कामगारांसाठी स्वतंत्र वसाहत वसवण्यात येणार असल्याचे जाहिरातपत्रक राष्‍ट्रवादी जनरल कामगार युनियनतर्फे वाटले जात आहे. युनियनचे अध्यक्ष विजयदादा पाखरे असून त्यांच्यावर ठाणे व रायगड जिल्ह्याची जबाबदारी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय स्थापन करून या वसाहतीची जाहिरातबाजी व सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नगरचे विभागीय कार्यालय गुलमोहोर रस्त्यावरील दर्शन पॅलेसमध्ये असून युनियनचे सचिव वसंत पवार सदस्य नोंदणी करत आहेत, असे जाहिरातपत्रकात नमूद करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या पत्त्यावर धनलक्ष्मी पतसंस्थेचे कार्यालय आहे.
सदस्यत्वासाठीची पावती व ओळखपत्रावर राष्‍ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळ व झेंड्याचा वापर करण्यात आला आहे. ओळखपत्राच्या मागे मुख्य सल्लागार म्हणून माजी खासदार गोविंदराव आदिक यांचे नाव आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याशी संपर्क साधला असता मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत त्यांनी जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
गोरगरिबांकडून बारा हजार रुपये घेऊन स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याची माहिती प्रेमदान हडको परिसरातील जागरूक नागरिक सागर सुधाकर दुस्सल यांच्याकडून मला मिळाली. खातरजमा केली असता या प्रकल्पाला पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आशीर्वाद असल्याची दिशाभूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांची फसवणूक झाल्यास पक्षाची बदनामी होऊन निवडणुकीत विपरित परिणाम होणार असल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे केली आहे.’’
- विनित पाऊलबुधे, विरोधी पक्षनेता, महापालिका.

कर्ज देण्याचे आश्वासन
नियोजित प्रकल्पातील सदनिकेच्या बुकिंगसाठी साडेअकरा हजार रुपये, तर प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर सदनिकेच्या किमतीच्या दहा टक्केरक्कम भरावी लागणार आहे. सदनिकेच्या किमतीच्या 80 ते 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या श्रम, तसेच मनुष्यबळ मंत्रालयाकडून सवलत देण्यात येईल, असे जाहिरातपत्रकात म्हटले आहे.

राष्‍ट्रवादीचा काहीही संबंध नाही
राष्‍ट्रवादी काँग्रेसचा अशा कोणत्याही प्रकल्पाशी संबंध नाही. यासंदर्भात प्रदेश कार्यालयाला मिळालेल्या तक्रारीवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे शुक्रवारी नगरला येऊन चौकशी करणार आहेत.’’
- घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस.