आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - तुमचा आवाज दिल्लीपर्यंत मी पोहोचवण्याऐवजी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांमधून दोन खासदार निवडून द्या, म्हणजे हा आवाज त्याच दिल्लीपर्यंत पोहोचवतील, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले.
नगर-पुणे रस्त्यावरील राष्ट्रवादी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी पक्षातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुळे यांनी मार्गदर्शन केले. पालकमंत्री बबनराव पाचपुते, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, मेधा कांबळे, चित्रा वाघ, उषा दराडे, राजेंद्र पिपाडा, भानुदास मुरकुटे, किरण काळे आदी यावेळी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने महिला मेळाव्यास उपस्थित राहिल्याने मंडप अपुरा पडला. त्यामुळे काही महिलांना उन्हात ताटकळत थांबावे लागले.
सुळे म्हणाल्या, जिल्ह्यातील महिलांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवल्यास मी तो आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेन असे पाचपुते यांनी सांगितले, पण मला तुमच्यातूनच दोन खासदार हवे आहेत. तसे झाले तर तुमचा आवाज तुम्हीच दिल्लीपर्यंत पोहोचवू शकता.
सध्या सुमारे 1 लाख 25 हजार महिला विविध स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांत निवडून आल्या आहेत. महिलेला घराबरोबरच इतर जबाबदारीही सांभाळावी लागते. कष्ट करण्याची तयारी केवळ महिलांमध्येच असते. मद्यपान करून महिलांवर अत्याचार करणारा सुटणार असेल, तर हे चालणार नाही. त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. सर्व महिला संघटित झाल्या, तर कुणीही अन्याय करणार नाही. महिलांच्या हक्कांसाठी महिला रस्त्यावर उतरायला तयार आहेत, असे सुळे म्हणाल्या.
ज्या देशातील महिला सक्षम आहेत तोच देश सक्षम होतो. नवे महिला धोरण ठरवताना पोषण, शिक्षण व संरक्षण हेच धोरण ठेवावे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.