आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालव्यात आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- कुकडीच्या कालव्याच्या चालू अवर्तनातून पिण्याच्या पाण्याबरोबरच फळबागांनाही पाणी द्यावे, या मागणीसाठी चार दिवसांपासून आंदोलन करणारे आमदार राहुल जगताप यांना त्यांच्या समर्थकांसह शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार व त्यांच्या समर्थकांना बेलवंडी येथील साई लॉन्समध्ये नेण्यात आले.
 
कुकडीचे आवर्तन नुकतेच सुरु झाले आहे. आधी करमाळा व कर्जतला पाणी जाईल. त्यानंतर श्रीगोंद्याला पिण्यासाठी मिळेल. असेच सध्याचे नियोजन आहे. आमदार जगताप यांच्या मागणीनुसार पिण्या बरोबरच फळबागांना पाणी मिळाले पहिजे. त्यासाठी मोहरवाडी जवळील मुख्य कालव्यात आमदार जगताप यांनी त्यांच्या समर्थकांसह चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. जगताप यांच्या या भूमिकेमुळे कालव्यातून कर्जतच्या दिशेने पाणी नेणे प्रशासनापुढे आव्हान होते. शुक्रवारी दुपारी आमदारांना समर्थकांसह कालव्यातून हटवण्यासाठी गेलेले पोलिस रिकाम्या हाताने माघारी फिरले. दरम्यान, शनिवारी याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी पोहोचला. आमदारांना ताब्यात घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पाच गाड्यांमध्ये आमदार समर्थकांना बसवण्यात आले. बेलवंडीत कायदेशीर सोपस्कार करून आमदार व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आले. यादरम्यान पाण्याची उपलब्धता तपासून अहवाल देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता सु. ना. कोळी यांना दिला. दरम्यान, कुकडीच्या पाण्यासाठी बेलवंडी व लोणीव्यंकनाथसह विसापूर खालील इतर गावांत बंद पुकारण्यात आला.
 
तणावाची परिस्थिती 
पाण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या आमदार जगताप यांना शेतकरी आणि स्थानिकांनी चांगलीच साथ दिली.  जगताप आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरात काही  काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी   हस्तक्षेप करून तणाव निवळवला.
बातम्या आणखी आहेत...