आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या, उद्यापासून भारनियमन रद्द करण्याची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारनियमनामुळे नगरकर त्रस्त झाले आहेत. नियमित वीजबिल भरूनही भारनियमनाला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. भारनियमन तातडीने रद्द करा, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केले. दरम्यान, गुरूवारपासून शहरातील भारनियमन रद्द करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी दिली. 
 
तीन-चार दिवसांपासून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसचूना देता सुरू करण्यात आलेल्या या भारनियमनामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. दोन टप्प्यांत तब्बल आठ तास भारनियमन सुरू आहे. आमदार जगताप यांनी या भारनियमनाबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, बाबासाहेब गाडळकर, संजय झिंजे, उबेद शेख, अशोक बाबर, प्रा. अरविंद शिंदे, प्रशांत भालेराव उपस्थित होते.

 
कोळश्याच्या तुडवड्यामुळे भारनियमन सुरू करण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. गटाखालील वाहिन्यांवर हे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. शहरात ६० ते ७० टक्के वीजबिलाची थकबाकी आहे. महापालिकेकडे सुमारे १६४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. नागरिकांकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने शहराचा मोठा भाग गटाच्या खाली आला असल्याचे अधीक्षक अभियंता बोरसे यांनी सांगितले. 
 
जगताप यांन अभियंत्यांची कानउघाडणी केली. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे ही थकबाकी वाढली असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. थकबाकीदारांवर कारवाई करून नियमित वीजबिल भरणाऱ्या नागरिकांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. जोपर्यंत भारनियमन रद्द करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशारा जगताप यांनी दिला. त्यानंतर गुरूवारपासून भारनियमन रद्द करण्याबाबतचे लेखी पत्र बोरसे यांनी आंदोलकांना दिले. 
बातम्या आणखी आहेत...