आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादीचा ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मनपात ठिय्या आंदोलन केले. - Divya Marathi
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मनपात ठिय्या आंदोलन केले.
नगर: मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. दोन लहान मुलींसह महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला कुत्र्यांनी चावे घेतले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यापूर्वी वेळोवेळी या प्रश्नासंदर्भात आंदोलने केली. परंतु मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाने कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

शिलाविहार येथील परी पठाण या चार वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा एक लहान मुलगी महापालिका कर्मचाऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. 
 
दरम्यान, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी आयुक्त दिलीप गावडे यांना बुधवारी निवेदन देऊन कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती, तरीदेखील प्रशासनाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली दुपारी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मोकाट कुत्र्यांसह शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, मनपा रुग्णालयातील अनागोंदी कारभार, नालेसफाई आदी विषयांवर कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मनपा रुग्णालयात नुकताच एका गर्भवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी डॉक्टर, तसेच जबाबदार उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत महापालिका कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. अखेर आयुक्त दिलीप गावडे यांनी उपायुक्त बेहेरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठीदेखील तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त गावडे यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
 
निधी आणल्याचे दाखवा, एक लाखाचे बक्षीस मिळवा
आंदोलना दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना आव्हानच दिले. सत्तेवर येण्यापूर्वी मोठमोठी आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहर विकासासाठी अद्याप एक रुपयाचा निधी आणलेला नाही. निधी आणला असल्याचे त्यांनी सिद्ध केले, तर एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे बनसोडे म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...