आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Youth Congress President Drought Tour In AC Car

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दुष्काळी दौर्‍यात ‘एसी’चा थाट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दुष्काळात मुलाच्या लग्नावर कोट्यवधींचा खर्च करणारे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच धारेवर धरले होते. मात्र, त्यापासून इतरांनी कोणताही धडा घेतलेला नाही. नगर जिल्ह्याच्या दुष्काळी दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील एसी मोटारीमधून फिरत असून त्यांच्या दिमतीला तब्बल 12 वाहनांचा ताफा आहे. या वाहनांच्या इंधनावर दररोज हजारो रुपये खर्च होत आहेत.
दुष्काळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदे, पारनेर व नगर तालुक्याला बसला आहे. अनेक भागात पाण्याची टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भर उन्हात मैलोगणती पायपीट करावी लागते आहे. जिल्ह्यात सध्या 170 हून अधिक टँकर सुरू आहेत. दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 200 कोटी खर्च केले आहेत.
राज्यपाल के. आर. शंकरनारायणन यांनी नगरच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. दिल्ली येथील केंद्रीय समितीने दोनदा दुष्काळी भागाचा दौरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील 3 मार्चपासून जिल्ह्याच्या दुष्काळी दौर्‍यावर आहेत. दौर्‍याची सुरुवात त्यांनी संगमनेर तालुक्यापासून केली. कोपरगाव व राहुरीचा दौरा करून ते बुधवारी नगर शहरात दाखल झाले. पाटील यांच्या दुष्काळी दौर्‍याच्या ताफ्यात 10-12 वातानुकूलित वाहने आहेत. थंड हवेत बसून ते उन्हात होरपळणार्‍या शेतकर्‍यांच्या व्यथा पहात आहेत. चार दिवसांपासून हा दौरा सुरू असून वाहनांच्या इंधनावरच सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च झाले आहेत.
पाटील यांनी बारादरी येथे शेतकर्‍यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ मुरकुटे, प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण काळे, प्रदेश निरीक्षक प्रवीण काळभोर, प्राजक्त तनपुरे, शहाजी भोसले, विक्रमसिंह पाचपुते, मिलिंद दरेकर, अनिकेत भालसिंग, सुरेश वांढेकर व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव आदी यावेळी उपस्थित होते. रायसोनी महाविद्यालयातील 44 विद्यार्थ्यांना पक्षाच्या वेल्फर ट्रस्टच्या निधीमधून प्रत्येकी दोन हजारांचा धनादेश पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नाश्त्यावरून पाटील संतापले
शासकीय विश्रामगृहावर पाटील काही पदाधिकार्‍यांशी दौर्‍याबाबत चर्चा करत असताना सकाळच्या नाश्त्याची सोय केडगाव येथील कोतकर यांच्या संदीप हॉटेलवर केली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर संतापून ते म्हणाले, ‘‘तुम्ही मला दिवसभर उपाशीच फिरवणार का?’’ अखेर बारादरी (ता. नगर) येथील जनावरांच्या छावणीवर त्यांनी पोह्यांचा नाश्ता केला.

एसी मोटारीत बसून दुष्काळ कसा समजणार?
"एसी मोटारीत बसून दुष्काळाची तीव्रता समजत नाही. त्यासाठी ढेकळातून ढेकळं तुडवत चालावे लागते. महिला डोक्यावर तीन-तीन हंडे घेऊन जातात. एसी वाहनांतून दुष्काळी दौरा करणार्‍यांनी या महिलांप्रमाणे डोक्यावर तीन-तीन हंडे घेऊन चालून दाखवावे. दुष्काळाचे सरकारला गांभीर्य नाही. दुष्काळी कामांचे नियोजन केले गेले नाही. काँग्रेस सरकार लोकांना वेड्यात काढत आहे.’’
- अनिल राठोड, आमदार.