आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरीमध्‍ये ठेवीदारांची उपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केले. मात्र, जिल्हाधिकारी अनुपस्थितीत असल्याने तहसीलदारांना निवेदन देण्याची वेळ ठेवीदारांवर आली. गार्‍हाणे मांडायचे कुणाकडे असा प्रश्‍न सध्या ठेवीदारांसमोर पडला आहे.

संपदा पतसस्थेत गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून 20 हजार ठेवीदारांच्या 32 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. सातत्याने प्रशासकीय यंत्रणांचे उंबरठे झिजवूनही ठेवीदारांना दिलासा मिळू शकलेला नाही. वैतागलेल्या ठेवीदारांनी शेवटी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही धावा केला. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली. ठेवपरतीसाठी पुन्हा अण्णांना साकडे घालण्याचे ठेवीदारांचे प्रयत्न सुरू आहेत. हक्काचे पैसे परत मिळत नसल्याचे ठेवीदार सध्या सैरभैर झाले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याची नोटिस पंधरा दिवसांपूर्वीच देण्यात आली. मात्र, त्यांचे गार्‍हाणे ऐकून घेण्यास एकही जबाबदार अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता.

संस्था डबघाईला आणणार्‍या तत्कालिन संचालक व त्यांच्यावर कारवाई न करणार्‍या प्रशासनाच्या विरोधात दिवसभर निषेधाच्या घोषणा ठेवीदारांकडून देण्यात येत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार व निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव गैरहजर असल्याने गृहशाखेच्या तहसीलदारांना ठेवीदारांनी मागण्यांचे निवेदन दिले. संतापलेले ठेवीदार व तहसीलदार यांच्यात बाचाबाचीही झाली. निवेदनात म्हटले आहे, ठेवीदारांच्या पैशांवर तत्कालिन संचालक महागड्या चारचाकी गाड्यांमधून मजा मारत फिरत आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यात राजरोसपणे दोषी संचालक फिरत आहेत. त्यामुळे प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई करत आहे. जिल्हा उपनिबंधक थकीत कर्जाच्या वसुलीला गती देत नाहीत. जिल्हाधिकारी दोषींच्या मालमत्तांवर टाच आणण्याची कारवाई करण्यात कच खात आहेत, तर सबळ पुरावे असतानाही नव्याने गुन्हा दाखल करण्यास जिल्हा पोलिस अधीक्षक तयार नाहीत.

अण्णांकडून अपेक्षा

स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णा हजारे यांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला. याच पार्श्वभूमीवर ‘संपदा’च्या प्रo्नात अण्णांनी लक्ष घालण्यासाठी पाठपुरावा करू. अण्णांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. जिल्हाधिकार्‍यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’ अँड. नीळकंठ सोले, निमंत्रक, ठेवीदार बचाव कृती समिती.

मंडळाकडून प्रयत्न सुरू
संस्थेवर नियुक्त प्रशासकीय मंडळ वसुलीच्या प्रयत्नात आहे. एल. एम. बुरा यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे थोडा खंड पडला. त्यांच्या जागेवर दुसर्‍या व्यक्तीची निवड केली. कलम 88 च्या कारवायांबाबत खंडपीठातून स्थगिती मिळालेली आहे. ’’ दिगंबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक.

या आहेत मागण्या

दोषी संचालकांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात यावा.
लेखापरीक्षण अहवालानुसार संबंधितांवर आर्थिक गुन्हे दाखल करण्यात यावेत.
बेंटेक्सच्या दागिन्यांवर दिलेल्या 9 कोटी रुपये कर्जाची संबंधितांकडून वसुली करण्यात यावी.
सन 2012-13 चे लेखा परीक्षण तातडीने करण्यात यावेत.
डबघाईला आलेल्या पतसंस्थेला ‘अ’ वर्ग देणार्‍यांवर कारवाई करा.
कलम 88 नुसारच्या कारवायांना ताबडतोब वेग देण्यात यावा.
कर्जदारांकडून वसुलीला गती
आवश्यक कारवाया करून ठेवीदारांच्या ठेवी परत करा