आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहरू मार्केटसाठी आजपासून बेमुदत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत भाजी मंडईसाठी बहुउद्देशीय व्यापारी संकुल बांधण्याचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवारपासून (15 फेब्रुवारी) बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नेहरू मार्केट कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा आणि चितळे रोड हातगाडी व भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोढा म्हणाले, नेहरू मार्केटच्या जागेत भाजी मंडईसह व्यापारी संकुल बांधण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करा; अन्यथा 15 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने 7 फेब्रुवारीला महापालिका प्रशासनाला दिला होता, परंतु प्रशासनाने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. मनपाच्या नाकार्तेपणामुळे गेल्या 3 वर्षांत नेहरू मार्केटचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागत असून परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुळात गरज नसताना नेहरू मार्केट उद्ध्वस्त करण्यात आले, असे सांगून लोढा म्हणाले. या जागेत भाजी मंडईसह व्यापारी संकुल उभारण्याचे गाजर तेव्हा नगरकरांना दाखवण्यात आले. मात्र, जाचक अटींमुळे एकही ठेकेदार व्यापारी संकुलाचे काम घेण्यास तयार नाही. महापालिका झाल्यानंतर सर्वांत अगोदर दिल्ली दरवाजाजवळील शॉपिंग सेंटर जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर नेहरू मार्केटवर हातोडा टाकण्यात आला. आगामी काळात प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळे पाडण्याचा विचारही मनपा करीत आहे.

नेहरू मार्केटचा प्रश्न सोडवण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता मार्केटच्या मोकळ्या जागेत बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाने उपोषणाची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही सुरू न केल्यास नागरिक, तसेच अन्य संघटनांनी रास्तारोको, धरणे, चक्री उपोषण आदी सनदशीर मार्गांचा अवलंब करून कृती समितीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन लोढा व झिंजे यांनी केले.