आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या नेहरू मार्केटप्रश्नी भाजीविक्रेत्यांचा मनपावर मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटचे रखडलेले काम तातडीने सुरू करा, या मागणीसाठी नेहरू मार्केट कृती समितीच्या नेतृत्वाखाली चितळे रोड हातगाडी चालक व भाजीविक्रेत्यांनी गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढला. याप्रश्नी तातडीने कार्यवाही न केल्यास 15 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्याच्या नावाखाली मनपा प्रशासनाने चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केट जमीनदोस्त केले, परंतु गेल्या चार वर्षांत हे काम सुरू झालेले नाही. अनेकवेळा आंदोलने करूनही काम ठप्प आहे. केवळ निविदा प्रसिध्द केल्या जात आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांना नाईलाजाने रस्त्यावर पथारी मांडून बसावे लागते. परिणामी वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

अनेक महिन्यांपासून नेहरू मार्केटच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजीविक्रेत्यांनी अखेर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी नेहरू मार्केटच्या जागेवर जमलेल्या भाजीविक्रेत्यांनी मनपावर मोर्चा काढून उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांना निवेदन दिले.

मनपा प्रशासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही न केल्यास बेमुदत उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी या लढय़ात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून नेहरू मार्केटप्रश्नी निर्णय घेऊ, असे आश्वासन डॉ. डोईफोडे यांनी दिले. यावेळी भाजपचे वसंत लोढा, संजय झिंजे, प्रमोद मोहोळे, शाकीर शेख, शिरीष लहाडे, उबेद शेख, शिरीष बापट, र्शीराम येंडे, अनंत जोशी आदी उपस्थित होते.