आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजी विक्रेत्यांचा मनपामध्ये ठिय्या, आयुक्त करणार आज मार्केटच्या जागेची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका स्थायी समितीने चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना बसण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही. त्याच्या निषेधार्थ भाजी विक्रेत्यांनी सोमवारी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
नेहरू मार्केटची मोकळी जागा भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात बसण्यासाठी देण्यात यावी, असा ठराव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. परंतु त्याबाबत मनपा प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे स्थायी सभापती गणेश भोसले यांनी भाजी विक्रेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीस एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे संतापलेल्या भाजी विक्रेत्यांनी चितळे रस्ता भाजी विक्रेते हातगाडी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, माजी सभापती किशोर डागवाले, उबेद शेख, दीपक सूळ यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

सभापती भोसले यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या सर्व विभागप्रमुखांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकत्यांनी केली. भाजी विक्रेते स्वत:हून रस्त्यावरून उठण्यास तयार आहेत, परंतु प्रशासन जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणताच निर्णय घेत नाही.

मनपाने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यास भाजी विक्रेत्यांनी कुठे बसायचे, असा प्रश्न झिंजे यांनी उपस्थित केला. यावेळी भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नेहरू मार्केटची जागा तत्काळ भाजी विक्रेत्यांना उपलब्ध करून द्या, अशी मागणी आंदोलनकत्यांनी लावून धरली. नेहरू मार्केटची जागा भाजी विक्रेत्यांना उपलब्ध झाल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अस इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

आयुक्त म्हणाले, मंगळवारी मी स्वत: नेहरू मार्केटच्या जागेची पाहणी करेल, जागेवर किती भाजी विक्रेते बसू शकतात, याचे मोजमाप करण्याचे आदेशही त्वरीत देण्यात येतील, भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी लाईनआऊट करून दिल्यानंतर नेहरू मार्केटच्या जागेवर बसण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर भाजी विक्रेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी डॉ. व्ही. के. तांदळे, राम धोत्रे, शकुर शेख, बाळासाहेब तरोटे, आर. टी. सांगळे, बाळाजी गौरी, अनिल अरगोंडा आदी उपस्थित होते. भाजीविक्रेत्यांच्या आंदोलनामुळे मनपा कार्यालय दणाणले.


फोटो - निषेधार्थ सोमवारी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करताना भाजी विक्रेते संघटनेचे पदाधिकारी.