आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आदिम'चे पहिले वर्गणीदार होते नेमाडे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साहित्यातील चाकोरी मोडणारे 'आदिम' नगरमधून प्रकाशित होतंय, हे समजताच वर्गणीची पहिली मनिऑर्डर भालचंद्र नेमाडे यांनी पाठवली. साहित्यात असे नवे प्रयोग करणा-या ग्रामीण भागातील लेखक, कवींना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. अशा साहित्यिकाला ज्ञानपीठ जाहीर झाल्याचे समजताच मनापासून आनंद झाला, असे प्रसिद्ध रेखाटनकार श्रीधर अंभोरे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाल्याचे शुक्रवारी दुपारी समजताच नगरच्या साहित्य वर्तुळात आनंदाची लहर पसरली. नोकरीच्या प्रारंभीच्या काळात नेमाडे येथील अहमदनगर महाविद्यालयात प्राध्यापक होते. नगरच्या वास्तव्यात भेटलेली माणसं नेमाडे यांच्या नंतरच्या काही कादंब-यांमध्ये नंतर उतरली. नगरच्या लेखक, कवींशी त्यांचे जिव्हाळ्याचे बंध जुळले, ते आजतागायत कायम आहेत.

नेमाडे यांच्याविषयी सांगताना रेखाटनकार अंभोरे म्हणाले, "कोसला'पासूनच नेमाडे यांनी स्वत: वेगळी वाट चोखाळली. त्यांच्या कादंब-यांचा फॉर्म वेगळा आहे. नेहमीपेक्षा वेगळं करणा-यांना त्यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन मिळते. नगरमधून आम्ही "आदिम' हे वेगळ्या धाटणीचे सायक्लोस्टाइल लघुनियतकालिक सुरू केलं, तेव्हा अनेकांनी त्याचं स्वागत केलं. पण पहिल्यांदा कोण वर्गणीदार झाले असतील, तर ते नेमाडे. त्यांनी पाठवलेल्या मनिऑर्डरची स्लीप मी अनेक वर्षे जपून ठेवली होती.

साहित्यिक प्रा. एन. बी. मिसाळ म्हणाले, अहमदनगर महाविद्यालयातील नेमाडे यांचा कार्यकाळ त्यांना समृद्ध करणारा ठरला. प्रवाहाच्या आणि काळाच्या विरुद्ध जाणारे नेमाडे स्पष्टवक्ते असल्याने त्यांच्या विधानांवरून नेहमीच वाद निर्माण झाले, पण त्याची तमा त्यांनी कधी केली नाही. मध्यंतरी मराठी साहित्य संमेलनाबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यामुळे असाच वाद झाला होता. असा परखडपणा केवळ नेमाडेच दाखवू शकतात.

प्रा. डॉ. धोंडिराम वाडकर म्हणाले, नेमाडे यांनी आपल्या कादंब-यांत समाजातील वास्तव मांडले. कोणाचीही भीड न बाळगता त्यांनी सत्य सांगितले. त्यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या माणसाला, लेखकाला ज्ञानपीठ मिळणे ही मोठी गौरवाची आणि आनंदाची बाब आहे.
प्रा. प्रियदर्शन बंडेलू यांनी नगर महाविद्यालयातील नेमाडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, नेमाडे वर्षभरच नगर महाविद्यालयात होते. त्यांचा स्वभाव लहरी असला, तरी एकदा ते वर्गात आले की अप्रतिम शिकवत. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते अल्पावधित लोकप्रिय झाले. नगरचा अनुभव त्यांच्या साहित्य वाटचालीला समृद्ध करण्यासाठी उपयोगी पडला. मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट करायची होती. त्यासाठी मी औरंगाबादला जाऊन त्यांना भेटलो. पण तो योग नव्हता...