आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साठ हजार नवे मतदार प्रथमच करणार मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यात 29 लाख 45 हजार मतदार असून आतापर्यंत 60 हजार 657 जणांचे मतदार नोंदणी अर्ज आले आहेत. या नवीन मतदारांना आगामी निवडणुकीत प्रथमच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदार नोंदणीसाठी आठ दिवसांची आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सोमवारी दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याबाबत 16 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर मुदत दिली होती. राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत प्रत्येक गावातील केंद्र बूथ मतदान अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी, सरपंच, पोलिस पाटील यांच्या संयुक्त पथकाद्वारे घरोघरी जाऊन ज्या मतदारांची नावे यादीत नाहीत. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयांतही मेळावे घेण्यात येऊन मतदार नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. मतदार याद्यांबाबत काही हरकती असल्यास तहसील कार्यालय व मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांकडे 25 ऑक्टोबरपर्यंत नोंदवाव्यात. जिल्ह्यात साडेतीन हजार केंद्र बूथ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत यंदा दोन टक्के मतदारांची नोंद झाली आहे. नवविवाहितांच्या नावांचाही मतदार यादीत समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी संबंधित नवविवाहितेच्या घरी तिच्या नावाची नोंदणी करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी दुष्काळामुळे जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. यावर्षी जिल्ह्यात 116 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला थोडा रिलिफ मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या 15 ते 16 टँकर सुरू आहेत. निंबळक बाह्यवळण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून डिसेंबरमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

कारवाईचे आश्वासन हवेतच..
मतदार नोंदणीत कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना थेट निलंबित करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. सोमवारच्या पत्रकार परिषदेत माळी यांना कामचुकारपणा करणार्‍या किती कर्मचार्‍यांवर कारवाई केली याबाबत विचारले असता त्यांना निश्चित काही सांगता आले नाही.

दीड लाख मतदार वगळले
नवीन मतदारयादीतून मृत, दुबार व स्थलांतरित अशा एकूण 1 लाख 46 हजार जणांची नावे वगळण्यात आली आहेत. ज्यांची नावे राहून गेली असतील, त्यांनी आपल्या जवळच्या केंद्रावर नोंदणी करावी. मतदार नोंदणीचे आक्षेप नोंदवण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 27 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदवावेत.’’ सुनील माळी, जिल्हा निवडणूक अधिकारी